सम्यक बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित राजमाता इंटरप्रायजेस नावाच्या संस्थेमार्फत चौघांनी महिलांना लुबाडल्याचे दोन दिवसांपूर्वी उघड झाले होते. आता याच चौकडीने एका वकील महिलेलाही तब्बल १८ लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. राजमाता एंटरप्रायजेस संस्थेची अध्यक्षा निकिता गोकूळ कांबळे, विकास रामभाऊ मुळे, अमोल मोरे आणि विठ्ठल खांडेभराड अशी या चार आरोपींची नावे असून यांनीच सम्यक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत राजमाता एंटरप्रायजेस ही संस्था स्थापन करून त्याद्वारे अनेक महिलांना व्यवसाय सुरु करण्याचे अमिष दाखवले होते.
राजमाता एंटरप्रायजेस नावाच्या संस्थेमार्फत चौघांनी न्यायनगरमधील एका ३२ वर्षीय वकील महिलेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पोलिस आयुक्तालयात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, वकील महिलेची या चौघांपैकी एकाशी आधी एका फौजदारी प्रकरणादरम्यान ओळख झाली होती. यावेळी त्याने राजमाता इंटरप्रायजेस या संस्थेमार्फत बचत गटातील महिलांना मोफत शेळी वाटप करत असल्याचे सांगितले होते. तसेच महिलेलादेखील शेळी वाटपाच्या कार्यक्रमाला बोलावले होते. यादरम्यान त्याने संस्थेसाठी केंद्र शासनाकडून सात कोटींचा निधी आणल्याचे देखील सांगितले. या व्यतिरिक्त बरेच उपक्रम संस्थेमार्फत राबवले जात असल्याची माहिती दिली होती. याद्वारे आपण लवकरच स्टार व्हिजन- २१ ही ट्रेडिंग कंपनी सुरु करत असल्याचेही सांगितले होते.
ही वाचा:
राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी
पाकिस्तानातील हिंदू मंदिरात लुटालूट
मुंबई पोलिसांनी घेतले सचिन वाझेला ताब्यात…
२४ जानेवारी २०२१ मध्ये विकासने कंपनीचे उद्घाटन केले. त्यासाठी त्याने मुंबई- पुण्याहून प्रतिष्ठित व्यक्ती आल्याचे सांगितले आणि त्यांच्यासोबत वकील महिलेची ओळखही करुन दिली. आता कंपनीचे उद्घाटन झाल्यामुळे खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले. पण अजूनही काही छोटी- मोठी कामे राहिली असून त्यासाठी तीन लाखांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानंतरही काही इतर बहाण्यांनी पुन्हा पैसे उकळणे सुरु ठेवले.
या सर्व पैसे उकळण्याच्या प्रक्रियेत प्रमुख आरोपी विकास मुळे याने वकील महिलेला कधी पाच तर कधी दहा हजार रुपये परत केले. पण उर्वरीत पैसेदेखील लवकरच देण्याचे आश्वासन दिले. मात्र नंतर अचानक राजमाता एंटरप्रायजेस संस्थेचे कार्यलय बंद केल्याचे महिला वकिलाला कळले. त्यांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रेडिंग कंपनीचे कार्यालयही बंद दिसले. तोपर्यंत विकास मुळे व त्याच्या साथीदारांनी या महिलेकडून १८ लाख १० हजार रुपये उकळले होते.