देशभरात कोविड-१९ विरुद्धच्या लसीकरणाची मोहिम मोठ्या वेगाने चालू आहे. लवकरच या मोहिमेचा दुसरा टप्पा देखील चालू होईल. या टप्प्यांतर्गत ५० वर्षांच्या वरील सर्व नेत्यांना लस देण्यात येणार आहे. यामध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ७० वर्षांचे असल्याने त्यांचा या टप्प्यात क्रमांक लागू शकतो.
मोदी यांनी नुकतीच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी मोदी यांनी सर्वांनी संयम बाळगावा. दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लस देण्यात येईल. त्यामुळे कोणीही मध्येच लस घेण्याची घाई करू नये. वय वर्षे ५० च्या वर असलेल्या सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांना लस मिळणार आहे. मात्र लसीकरणाचा दुसरा टप्पा नेमका केव्हा चालू होईल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
१६ जानेवारी रोजी भारताच्या लसीकरणाच्या मोहिमेस प्रारंभ झाला होता. त्यापुर्वी ११ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत लसीकरकणाच्या पहिल्या टप्प्यात सर्व राजकीय नतृत्वांचा समावेश करण्याचा सल्ला नरेंद्र मोदी यांनी तात्काळ फेटाळून लावला होता.
लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मोदींनी सर्व नागरिकांना संयम बाळगून आपला क्रमांक आला की लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. या मोहिमेला सुरूवात झाल्यानंतर या लसीमुळे काही दुष्परिणाम होत असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले. मात्र मोदींना, भारतातील शास्त्रज्ञांनी, वैद्यकीय तज्ञांनी सुरक्षेचा निर्वाळा दिल्यानंतर लस देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने तयार केलेल्या कोविड-१९ वरच्या कोविशिल्ड या लसीचे १० लाख डोस भारताने काठमांडू, नेपाळ येथे पाठवले आहेत, तर २० लाख डोस ढाका, बांगलादेश येथे पाठवण्यात आले आहेत.