बुधवार, २७ ऑक्टोबर रोजी भारताकडून संरक्षण विषयातील आणखीन एक महत्त्वाची कामगिरी करण्यात आली आहे. भारताने अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून दाखवली आहे. हे क्षेपणास्त्र सरफेस टू सरफेस प्रकारातील म्हणजेच जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी बनवण्यात आले आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताची शस्त्रसज्जता अधिक बळकट होणार असल्याचे म्हटले जात आहे.
ओरिसा येथील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून बुधवारी संध्याकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. भारत सरकार मार्फत एक प्रसिद्धीपत्रक काढून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. अग्नी-५ हे अतिशय भेदक क्षेपणास्त्र असून या क्षेपणास्त्राची अचूक मारा करण्याची क्षमता खूप अधिक आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांविरोधात महिला आयोगातही तक्रार
‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी
नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निधीचा प्रवाह
या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये बघायची झाली तर अचूक लक्ष्यभेद करण्याच्या क्षमतेसह अग्नी-५ क्षेपणास्त्र हे तब्बल ५ हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. तर या क्षेपणास्त्रात ३ टप्प्यात काम करणाऱ्या इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. अग्नी-५ क्षेपणास्त्र हे खास चीनकडून भारताला असलेला धोका लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण असे असले तरी देखील भारताच्या संरक्षण धोरणाशी म्हणजेच ‘विश्वसनीय किमान प्रतिबंध’ आणि ‘प्रथम वापर न करणे’ यानुसारच हे क्षेपणास्त्र कार्यरत असणार आहे.