आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था अशी ओळख मिरवणाऱ्या बुलढाणा अर्बन या पतसंस्थेची आयकर विभागामार्फत चौकशी सुरू आहे. पतसंस्थेच्या मुख्य शाखेत ही आयकर विभागाची धाड पडली आहे. काल म्हणजेच बुधवार, २७ ऑक्टोबर रोजी आयकर विभागाचे पथक बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले. काल सकाळपासून आयकर विभागाच्या ११ अधिकाऱ्यांचे पथक हे बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या काही विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहेत.
काल सकाळपासून सुरू झालेली ही चौकशी अद्याप संपलेली नाही. रात्रभर ही चौकशी सुरू होती. दरम्यान या सर्व परिस्थितीमुळे बुलढाणा अर्बन बँकेच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला गेला आहे. कोणालाही कार्यालयात आत सोडले जात नाहीये किंवा कार्यालयातून बाहेरही पडता येत नाही.
हे ही वाचा:
नवाब मलिकांविरोधात महिला आयोगातही तक्रार
नवाब मलिक, एनसीबीसंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार हे चार अधिकारी
नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निधीचा प्रवाह
या चौकशीमुळे आता बुलढाणा अर्बन पतसंस्थेत कोणता गैरव्यवहार झाला आहे का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. तर या पतसंस्थेतील ठेवीदार ही संभ्रमावस्थेत असल्याचे समजत आहे. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी धाडसत्र चालवले आहे. तर या धाडींमधून कोट्यावधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार, कर चोरी अशा बाबी समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता बुलढाणा अर्बन पतसंस्थेवर धाड पडल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान या चौकशीच्या संदर्भातील कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे नेमकी आयकर विभागाची चौकशी कधी संपणार आणि यातून काही कारवाई समोर येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे