पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ते नवीन पक्ष काढणार असल्याची पुष्टी केली. त्याचबरोबर त्यांचा हा नवा पक्ष भाजपसोबत जागावाटपाच्या चर्चा करेल, परंतु ते अकाली दलासोबत युती करण्यास तयार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच त्यांच्या या पक्षाचे नाव अद्याप ठरलेले नाही, असेही ते म्हणाले.
“निवडणूकआयोगाला निर्णय घेऊ द्या. आम्ही चिन्ह आणि नावासाठी विनंती केली आहे. आम्हाला मंजुरी मिळाल्यावर आम्ही माध्यमांना कळवू.” असं ते म्हणाले.
ड्रोन हल्ल्यांच्या वाढत्या संख्येमुळे राज्याची सुरक्षा धोक्यात आली आहे, असेही ते म्हणाले. पूर्वी शस्त्रे आणि ड्रग्स तैनात करण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला होता, आता स्फोटके देखील उपकरणांद्वारे सोडली जात असल्याचे ते म्हणाले. “मी उगाच आरडाओरडा करणारा नाही. पण मला माहित आहे की काहीतरी वाईट घडत आहे,” असं ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी सरकारला यावर कारवाई करण्याचे आवाहन केले. “ग्रामस्थांना सांगा की ड्रोन येत आहेत. या गुपचूप युद्धाबद्दल आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. आपण, पंजाबचे रक्षण केले पाहिजे.” असं ते पुढे म्हणाले.
पत्रकार परिषदेच्या एक दिवस आधी, काँग्रेस हायकमांडने मंगळवारी पंजाबमधील पक्षाच्या अनेक नेत्यांशी संपर्क साधला. अमरिंदरचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी बुधवारी पत्रकारांसाठी निमंत्रण पाठवताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी किमान पाच आमदारांना दिल्लीत आमंत्रित केले आणि त्यांच्याशी स्वतंत्र बैठका घेतल्या.
हे ही वाचा:
‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’
फडणवीस खरे ठरले! जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट
हिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण!
नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भ गायब!
मंगळवारी त्यांच्या राजकीय ‘विरोधकांवर’ निशाणा साधत सिंग यांनी पटियाला येथे त्यांच्या समर्थकांवर हल्ला केल्याचा आरोप केला. “वैयक्तिक हल्ल्यांपासून ते आता पटियाला आणि इतरत्र माझ्या समर्थकांना धमक्या आणि त्रास देण्याकडे झुकले आहेत. मी माझ्या विरोधकांना सांगू इच्छितो की ते अशा खालच्या पातळीचे राजकारण करून माझा पराभव करू शकत नाहीत. अशा डावपेचांनी ते ना मतं जिंकणार आहेत आणि ना लोकांची मनं जिंकणार आहेत.” असं ते म्हणाले.