ठाण्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील एका शाळेतील दहावीच्या दोन तुकड्यातील विद्यार्थ्यांत झालेल्या हाणामारीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. या भांडणातून १५- १६ वर्षांच्या मुलांनी त्यांच्याच वयाच्या विद्यार्थ्याचा जीव घेतला.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या शाहू महाराज विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या दोन तुकड्यांमध्ये शाळेजवळील प्रगती रुग्णालय येथील पाईपलाईन ब्रिजवर भांडणे होऊन त्यांची हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान तीन विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षीय विद्यार्थ्याच्या छातीत सुरा खुपसून निर्घृण हत्या केली. विद्यार्थ्यावर झालेला वार इतका जोरदार होता की रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या विद्यार्थ्यांमध्ये भांडण कशामुळे झाले, याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, शाळेत खेळण्यावरून आणि आपापसातील वादामुळे ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
मोदी सरकार या १३ विमानतळांचे खासगीकरण करणार
समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?
‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे
पाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!
या प्रकरणी तीन आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर उचित कारवाई केली जाईल, असे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.