नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईत ड्रग विरोधी मोहीम चालवणारे धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडे यांनी गेल्या काही काळात अनेक बड्या धेंड्यांच्या कॉलरला हात घातला आहे. यावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले असून समीर वानखेडे यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा दिली गेली आहे.
महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. तर शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मलिकांच्या सुरात सूर मिसळला आहे. समीर वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तर त्यांच्या कुटुंबियांवरही खालच्या पातळीची टीका होताना दिसत आहे.
हे ही वाचा:
अमरिंदर सिंग उद्या नवीन पक्षाची घोषणा करणार?
कोवॅक्सिनला २४ तासात मिळणार डब्ल्यूएचओची मान्यता
भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा
समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?
या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे हे सध्या दिल्ली मध्ये आहेत. या हाय प्रोफाइल केसमध्ये समीर वानखेडे यांच्या जीवाला धोका असल्याचे बोलले जात होते. तर त्यातच आता केंद्र सरकार कडून त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवली गेली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले जात आहे.