राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून एनसीबी आणि मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवायांना चांगलाच जोर आला आहे. आज (२६ ऑक्टोबर) मुंबई गुन्हे शाखा पथक ६ ने एक कारवाई करत तब्बल २४ किलो चरस जप्त केले आहे. मुंबईतील दहिसर चेक नाका येथून २४ किलो चरस मुंबई गुन्हे शाखा विभागाने जप्त केला आहे. तसेच कारवाई दरम्यान चार जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
हे ड्रग्ज राजस्थानहून मुंबईत रस्त्याच्या मार्गे आणले जात होते. मुंबई गुन्हे शाखेचे पथक एक महिन्यापासून मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचून होते. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत १ कोटी ४४ लाख रुपये इतकी आहे. मुंबई गुन्हे शाखा पथक ६ ने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी पवई येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हे पथक अंमली पदार्थ तस्करांची वाट पाहत होते.
हे ही वाचा:
समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?
‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे
पाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!
मुंबईकरांची लाईफ लाईन धावणार १०० टक्के क्षमतेने
काही दिवसांपूर्वीच घाटकोपर युनिट- ७ ने मुंबईतील सायन येथे अशीच धडक कारवाई करण्यात आली होती. कारवाई दरम्यान एका महिलेकडून तब्बल २१ कोटी रुपयांचे सात किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. आरोपी महिलेला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले होते. या महिलेची चौकशी केली असता तिने हे हेरॉईन राजस्थान येथील दोन व्यापाऱ्यांकडून मागवले असल्याचे सांगितले.