महाराष्ट्रात पोलिसांचे १०० कोटींचे टार्गेट गाजत असतानाच नुकतेच आयकर विभागानेही एक १०० कोटींचे टार्गेट पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाने टाकलेल्या धाडीतून १०० कोटींपेक्षा अधिकच्या बेहिशेबी उत्पन्नाचे धागेदोरे पुढे आले आहेत. गुरुवार, २१ ऑक्टोबर रोजी या सर्व धाडसत्राला सुरुवात झाली.
बांधकाम व्यवसायात असलेल्या विशेषतः जमीन संकलनाचे व्यवहार करणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रकरणाच्या संदर्भात ही तपास आणि जप्तीची मोहीम आयकर विभागा मार्फत राबवण्यात आली. या कारवाई दरम्यान जमिनीचे करारनामे, नोटराईज्ड कागदपत्रे आणि मालमत्ता संपादनासाठी मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे हस्तांतरण दर्शविणारे इतर दस्तावेज अशी अनेक संशय निर्माण करणारी कागदपत्रे आढळून आली आहेत. ही सर्व कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्या सोबतच घटनास्थळी असलेले संगणक तसेच मोबाईल फोन यांच्या नोंदींमध्ये देखील या व्यवहारांची पुष्टी करणारे काही डिजिटल पुरावे मिळाले आहेत.
या व्यतिरिक्त काही खासगी लॉकर्समध्ये मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम आढळून आली. आतापर्यंत, २३.४५ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर प्रतिबंधात्मक आदेशा अंतर्गत एक लॉकर देखील सील करण्यात आला आहे. या सोबतच इतर बँकांच्या लॉकर्सची माहिती पुढे आली असून ते लॉकरही सील करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती
नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत
मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र
पाकिस्तानने ३५० दहशतवादी मोकाट सोडले
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध सध्या सुरु आहे ज्यांनी जमिनीच्या मोठ्या पट्ट्यांच्या खरेदीसाठी बेहिशेबी उत्पन्नाची गुंतवणूक केली. यामध्ये बहुतांश व्यक्ती महाराष्ट्रातील पिंपळगाव बसवंत भागात कांदा आणि इतर नगदी पिकांचा घाऊक व्यापार करणाऱ्या आहेत. या व्यापाऱ्यांनी मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोख रकमा हस्तांतरित केल्याच्या नोंदींसह गुन्ह्याची शक्यता दर्शविणारी इतर कागदपत्रे या तपासणीत आढळून आली आहेत.