शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते नाशिक महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या बिटको रुग्णालयाचे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नामकरण करण्यात आले. या सर्व घडामोडींमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे रूग्णालयासमोर लावलेले मोठे होर्डिंग. या रुग्णालयाच्या समोरच शिवसेनेकडून मोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. या होर्डिंगवर बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांचा मोठा फोटो असून नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. स्वतः नाशिक रोडचे सभापती प्रशांत दिवे यांचा ही मोठा फोटो आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचाच फोटो होर्डिंगवरून गायब झाला आहे. त्याच बरोबर आदित्य ठाकरे यांचाही फोटो होर्डिंगवर लावण्यात आलेला नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णालयाचे भूमिपूजन हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले आहे. मात्र कार्यक्रमाला महापौर, आयुक्तही अनुपस्थित होते. याबाबत ‘न्यूज १८ लोकमत’ने या कार्यक्रमाचे निमंत्रक प्रशांत दिवे यांना विचारले असता त्यांनी हे होर्डिंग महापालिकेने लावले असल्याचे उडवा- उडवीच उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे चर्चांना मात्र उधाण आले आहे.
हे ही वाचा:
कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा
प्रभाकर साईलने त्याचे म्हणणे कोर्टात मांडावे
समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा
आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट…कोण आहे कुणाल जानी?
होर्डिंगमध्ये नसलेल्या फोटोमुळे नाराजी नाट्यही पाहायला मिळाले. शिवसेनेच्या नगरसेविका ज्योती खोले यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचा फोटो होर्डिंगवर नसल्याने नाराजी व्यक्त करत महापालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे. या होर्डिंगवर ज्योती खोले यांच्यासह आणखी चार नगरसेवकांचे फोटो नसल्याने त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते, मात्र होर्डिंगवर नाव असायला हवे असा अट्टहास खोले यांनी केला असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.