पश्चिम उपनगरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरातील मलनिस्सारण वाहिन्यांवरील मॅनहोलची झाकणे चोरीला गेली आहेत. मुख्य म्हणजे ही झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार अगदी बिनदिक्कतपणे सुरु आहेत. कुणाला याचे सोयरसूतक नसल्याचेही निदर्शनास येत आहे.
याकरता आता महापालिकेने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आहे. महापालिका प्रशासनातर्फे स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २० ते २५ झाकणे चोरीला गेली आहेत. या झाकणांची किमत ही अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये इतकी आहे.
पश्चिम उपनगरामध्ये झाकण चोरीचे प्रमाण खूप आहे. पालिकेच्या के/पूर्व विभागांतर्गत अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व व जोगेश्वरी पूर्व परिसरात मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. या गटारांवर स्वच्छता तसेच नियमित तपासणी करण्यासाठी या वाहिन्यांना मॅनहोल बसविण्यात आलेले आहे.
हे ही वाचा:
आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट…कोण आहे कुणाल जानी?
‘महाविकास आघाडी सरकारच आऊटसोर्स करण्याची आली वेळ’
शरद पवार प्रचंड बहुमताने विजयी; मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणूक
ठराविक अंतरावर मॅनहोल बसवण्यात आले असून, त्यावर झाकणे बसवण्यात आलेली आहे. या मलःनिसारण वाहिनीची १५ ते २५ फूट खोली आहे. त्यामुळे सुरक्षितता हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. यालाच अनुसरून चांगली लोखंडाची झाकणे बसविण्यात आली. परंतु या झाकणाची किंमत ही अंदाजे बारा हजार रुपये इतकी आहे. त्यामुळेच या मजबूत झाकण चोरीचे प्रकार वाढलेले आहेत. ज्या ठिकाणी अशी झाकणे मोठ्या प्रमाणात चोरली जात आहेत, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही आता तपासले जात आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्या आधारे अंधेरी एमआयडीसी व सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.