मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची रविवार, २४ ऑक्टोबरला निवडणूक होत असून त्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेले अध्यक्षपदाची निवड खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण या निवडणुकीत दिग्गज राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे अध्यक्षपदासाठी या संस्थेचे सदस्य असलेल्या धनंजय शिंदे यांच्याशी झुंजणार आहेत. त्यासाठी मतदार मात्र आहेत अवघे ३४.
शरद पवार हे १९९२पासून या संस्थेचे अध्यक्ष आहेत, पण प्रथमच या संस्थेची निवडणूक होत असून त्या संस्थेचे ६००० सदस्य असले तरी त्या सदस्यांना मात्र या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही. केवळ या संस्थेच्या विविध शाखांमधून निवडून आलेल्या ३४ प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार आहे. विशेष म्हणजे निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांनाही मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
दुसरी घटनाबाह्य गोष्ट म्हणजे या निवडणुकीसाठी कार्यकारिणीचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे; पण तो आता पाच वर्षांचा करण्यात आला आहे. त्यासाठी कोणतीही विशेष सभा घेऊन हा नियम तयार करण्यात आलेला नाही.
रविवारी ११ वाजता यासाठी मतदान होणार आहे. शरद पवार यांच्या गटातून भालचंद्र मुणगेकर, शशी प्रभू, विद्या चव्हाण आदि उमेदवार उभे असतील. तर धनंजय शिंदे यांच्या गटातून संतोष कदम, प्रमोद खानोलकर, रजनी जाधव, झुंझार पाटील, आनंद प्रभू, संजय भिडे, सुधीर सावंत हे उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणार आहेत.
गेल्या काही वर्षांत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची अवस्था बिकट झाली आहे. कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन नाही, पुस्तकांची विक्री झाल्याचे आरोपही होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे दादरमधील मोक्याच्या ठिकाणी या संस्थेची इमारत आहे. त्यामुळे ही जागा पुनर्विकासाच्या नावाखाली हस्तगत करण्याचा प्रयत्न होणार असल्याचा आरोप होत आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये का सुरु आहेत दंगली?
इस्लामचा त्याग करून इंडोनेशियाच्या राजपुत्री करणार हिंदुधर्मात प्रवेश! वाचा सविस्तर…
मुस्लिम समाजातील काही लोक का टाळत आहेत लसीकरण?
मुंबई- नाशिक महामार्गावरून जप्त केला ३५.९० किलो गांजा!
यापूर्वी शरद पवार यांनी सूचना केल्याप्रमाणे उपाध्यक्ष आणि विश्वस्तांची निवड होत असे मात्र आता प्रथमच ही निवडणूक होत आहे. याआधी विश्वस्त म्हणून शरद पवार यांची मुलगी व खासदार सुप्रिया सुळे या विश्वस्त राहिलेल्या आहेत. २०१७मध्ये अशी निवड करण्याचे पत्र शरद पवारांनी दिल्याचे समोर आले आहे. अनिल देसाई, पत्रकार प्रताप आसबे, रामदास फुटाणे, आदिंच्या नियुक्त्या शरद पवार यांच्या सूचनेनुसार झालेल्या आहेत. त्यामुळे प्रथमच होत असलेल्या निवडणुकीकडे वाचकांचे, मराठी माणसाचे लक्ष आहे.