ज्या इंडोनेशियात ९० टक्के मुस्लिम आहेत त्या देशाचे संस्थापक सुकार्नो यांच्या कन्या सुकमावती सुकार्नोपुत्री यांनी इस्लाम धर्माचा त्याग करून हिंदु धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर २०२१ला होत असलेल्या एका कार्यक्रमात त्या हिंदु धर्मात प्रवेश करणार आहेत. इंडोनेशिया सीएनएनने हे वृत्त दिले आहे.
हा धर्मांतराचा सोहळा ‘सुधी वाडानी’ या नावाने ओळखला जातो. बाली या शहरात हा सोहळा पार पडणार आहे. सुकमावती यांचे वडील सुकार्नो यांचे तिथे स्मारक आहे.
हिंदु धर्मात प्रवेश करण्यास त्यांच्या कुटुंबियांनीही परवानगी दिली आहे. सुकार्नो यांच्या तिसऱ्या पत्नीपासून सुकमावती यांचा जन्म झाला आहे. इंडोनेशियाचे पाचवे राष्ट्राध्यक्ष मेगावती सुकार्नोपुत्री हे त्यांचे भाऊ आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या ७० व्या वाढदिवशी त्यांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांची आजी इदा आयु न्योमन राय स्रीमबेन यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी हे धर्मांतर करण्याचे ठरविले आहे. त्यांचे बंधू आणि त्यांचे पुत्र यांनीही त्यांच्या या धर्मांतराला पाठिंबा दर्शविला असल्याचे कळते. अर्थात, हा सोहळा पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाचा असून कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक स्तरावर हा सोहळा होणार नाही. मात्र त्याची पत्रिका व्हायरल झाली आहे. इंडोनेशियन नॅशनल पार्टीची स्थापना सुकमावती यांनी केली आहे.
त्यांच्या वकिलांनी यासंदर्भात माहिती दिली की, सुकमावती यांना हिंदु धर्माचे प्रचंड ज्ञान असून हिंदुधर्मातील सर्व विधी, परंपरांबद्दल त्यांना माहिती आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये का सुरु आहेत दंगली?
मुस्लिम समाजातील काही लोक का टाळत आहेत लसीकरण?
मुंबई- नाशिक महामार्गावरून जप्त केला ३५.९० किलो गांजा!
२०१८मध्ये सुकमावती यांनी एक कविता लिहिली होती, ज्यातून ईश्वरनिंदा झाल्याचा आरोप तेथील इस्लामी धर्मप्रमुखांनी केला होता. त्या कवितेतून इस्लामवर टीका झाल्याचा हा आरोप होता. ईश्वरनिंदा केल्याबद्दल त्यांनी शिक्षा भोगावी असे या धर्मप्रमुखांचे म्हणणे होते. त्यांनी आपल्या कवितेत असे म्हटले होते की, महिलांनी केसांचा बांधलेला बुचडा हा त्यांनी घातलेल्या बुरख्यापेक्षा खूप सुंदर असतो. पण त्याविरोधात संताप व्यक्त केला गेला आणि त्यांना अटक करण्याची मागणी केली गेली. त्यानंतर सुकार्नोपुत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली होती. पण आता या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश घेण्याचे ठरविले आहे.