युरोपातील एका संवर्धन समूहाच्या अभ्यानुसार युरोपियन गव्यांच्या संख्येत वाढ झाली असून जगातील गोड्या पाण्यातील तिनही जातीचे डॉल्फिन आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या अभ्यासानुसार एमेझॉन नदीतील ‘टुसुक्सी’ जातीचे डॉल्फिनसुध्दा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
स्वित्झरलँड स्थित ‘द ग्लँड’ या समुहाच्या नव्या अभ्यासानुसार गोड्या पाण्यातील डॉल्फिनच्या तीन प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यात एमेझॉन नदीतील डॉल्फिन, दक्षिण आशियाई नद्यांतील डॉल्फिन आणि चीन यांगत्झी नद्यांतील डॉल्फिन यांचा समावेश होतो.
‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्जर्वेशन ऑफ नेचर’ (आय.यु.सी.एन) या पर्यावरण प्रेमी संस्थेच्या ‘रेड लिस्ट’ (लाल यादी) नुसार युरोपीयन गव्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरीही, धोक्यातील प्रजातींच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. ‘आय.यु.सी.एन’चे प्रमुख व्यवस्थापक डॉ. ब्रुनो ओबर्ले यांच्या सांगण्यानुसार युरोपियन गवा आणि २५ इतर प्रजातींची वाढलेली संख्या संवर्धनाची ताकद दाखवून देत आहे.
असे असले तरीही या संवर्धन समुहाच्या सांगण्यानुसार ३१ विविध प्रजाती विलुप्त झाल्या आहेत. मध्य अमेरिकेतील बेडकांच्या तीन प्रजाती आणि फिलिपीन्समधल्या एका तळ्यातील माशांच्या १५ प्रजातींचा समावेश होतो. दक्षिण चीनमधील समुद्री शार्क १९३४ मध्ये शेवटचा पाहण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या विलुप्त झाल्या असण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.
लाल यादीत एमेझॉन नदीतील टुसुक्सी या छोट्या आकाराच्या डॉल्फिनचा समावेश झाला आहे. विविध मानवीय हस्तक्षेपांमुळे या डॉल्फिनच्या संख्येत घट झाली आहे.
याच्याउलट २००३ पासून युरोपियन गव्यांच्या संख्येत वाढ नोंदली गेली आहे. उत्तम तऱ्हेने केलेल्या संवर्धनामुळे गव्यांच्या संख्येतील वाढ नोंदली गेली आहे, असे आय.यु.सी.एनने सांगितले आहे.
द टाईम्स ऑफ इंडियामध्ये याबाबत सविस्तर अहवाल प्रसिध्द झाला आहे.