चीनच्या शिंजियांगमध्ये उईगर समाजाविरोधात छळछावण्या उभारण्याविरोधात पाश्चिमात्य देशांनी बंदी घातलेल्या एका चिनी राजकारण्याला कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) च्या तिबेट युनिटचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही माहिती चीनच्या अधिकृत माध्यमांनी मंगळवारी दिली.
५८ वर्षीय वांग जुंझेंग हा शिंजियांग उईगर स्वायत्त प्रदेशाच्या सीपीसी समितीचा उपसचिव आणि शिंजियांग उत्पादन आणि बांधकाम युनिटचा राजकीय कमिशनर (कॉमीसार) होता. त्यावेळी त्याने अनेक छळछावण्या उभारून उईगर मुसलमानांची प्रताडना करण्याचा उपक्रम सुरु केला होता. यामध्ये असंख्य उईगर मुसलमानांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक उईगर मुसलमान आजही चिनी तुरुंगात सडत आहेत.
तिबेटच्या सीपीसी प्रमुखपदी केलेली वांग यांची नियुक्ती जागतिक मानवाधिकार गटांच्या फोकसमध्ये येईल. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) सुरू असलेल्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार त्याच्यावर बारीक नजर ठेवेल हे निश्चित.
तिबेट स्वायत्त प्रदेश (टीएआर) चे सध्याचे कम्युनिस्ट पक्षाचे सचिव, वू यिंगजी, ज्यांनी २०१६ मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नसला तरी ते लवकरच निवृत्ती घेतील असे सांगितले जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, अमेरिकेच्या कोषागार विभागाने वांग आणि शिंजियांग सार्वजनिक सुरक्षा ब्युरोचे संचालक चेन मिंगगुओ यांच्यावर मुस्लिम उईघुर समुदायाविरुद्ध मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी बंदी आणली होती.
अमेरिकेच्या ग्लोबल मॅग्निटस्की ह्युमन राईट्स अकाऊंटेबिलिटी ऍक्ट अंतर्गत शिंजियांगमधील दोघांच्या भूमिकेसाठी या दोघांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यात असे लिहिले आहे की, हे पाऊल युरोपियन युनियन, ब्रिटन आणि कॅनडा यांनी केलेल्या कृतींना पूरक आहे.
हे ही वाचा:
जामीन नाहीच; आर्यन खानचा तुरुंगमुक्काम वाढला
आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
अमेरिकेच्या कोषागार विभागाने म्हटले होते की, “शिंजियांगमध्ये घडणाऱ्या गंभीर मानवी हक्कांच्या उल्लंघनांचे उत्तरदायित्व वाढवण्यासाठी अमेरिका आपल्या आर्थिक अधिकारांचा संपूर्ण वापर करण्यास वचनबद्ध आहे.”