शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावून आज (२० ऑक्टोबर) चौकशीसाठी हजर राहण्यास आदेश दिले होते. मात्र, भावना गवळी आज चौकशीला हजर राहू शकणार नाहीत. त्याबाबत त्यांच्या वकीलामार्फत त्यांनी ईडी कार्यालयाला पत्र दिले असून तब्येत बरी नसल्यामुळे आणखी १५ दिवसांची वेळ त्यांनी मागवून घेतली आहे.
दोन दिवसांपूर्वीच ईडीने भावना गवळी यांना दुसरे समन्स बजावले होते. त्यांना २० ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, आज त्यांचे वकील इंद्रपाल सिंह ईडी कार्यालयात हजर होते. भावना गवळी या १३ ऑक्टोबरपासून आजारी असून त्यांच्यावर शासकीय डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत तसेच त्यांना चिकनगुनियाचे निदान झाले असून त्याचा अहवाल ईडीला दिला आहे. त्यामुळे ईडीकडून त्यांनी १५ दिवसांची वेळ मागून घेतली आहे, असे भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी सांगितले.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशच्या विकासाची गगनभरारी! कुशीनगर विमानतळाचे लोकार्पण
जयंत पाटलांच्या शिक्षण संस्थेने सरकारचीच जमीन सरकारला देऊन तीसपट मोबदला मिळवला!
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
खासदार भावना गवळी यांना यापूर्वीही ४ ऑक्टोबरला ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळी देखील त्यांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती. त्यानुसार ईडीने त्यांना मुदत दिली होती. मात्र, आता मुदतवाढ संपल्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा मुदतवाढ मागितली आहे.
गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर खासदार गवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ईडीने छापेमारी केली होती. तसेच महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खानला अटक करण्यात आली होती.