अनेक वर्षांपासून प्राण्याच्या अवयवाचे प्रत्यारोपण मानवी शरीरात होऊ शकते का यावर संशोधन सुरू होते. अखेर या संशोधनाला यश आले असून अमेरिकेच्या डॉक्टरांनी एका ब्रेन डेड रुग्णाच्या शरीरात डुक्कराचे मूत्रपिंड (किडनी) जोडले आणि ते कार्य करताना दिसले. अनेक दशके चाललेल्या या संशोधनातील हे एक यशस्वी पाऊल आहे. जगभरात प्रत्यारोपणासाठी अवयवांची कमतरता भासत असते आणि त्यासाठी डुक्कर हे सध्या संशोधनाचे केंद्रबिंदू आहे.
या प्रयोगासाठीचे मूत्रपिंड हे एका जनुक- संपादित (gene- edited) प्राण्याचे वापरण्यात आले होते. शल्यचिकित्सकांनी डुक्कराचे मूत्रपिंड रुग्णाच्या शरीराबाहेर मोठ्या रक्तवाहिन्यांना जोडून ठेवले आहे; जेणेकरून ते दोन दिवस त्याचे निरीक्षण करू शकतील. मूत्रपिंडाने आतापर्यंत त्याचे कार्य म्हणजेच कचरा फिल्टर करणे आणि मूत्र तयार करण्याचे काम केले असून कोणताही अडथळा निर्माण केलेला नाही.
हे ही वाचा:
आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा
प्राण्यांचे अवयव ते मानवी शरीरात त्याचे प्रत्यारोपण म्हणजेच झेनोट्रान्सप्लांटेशनचे (xenotransplantation) १७ व्या शतकात प्रयत्न करण्यात आले होते. प्राण्याचे रक्त वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर २० व्या शतकात प्राण्यांचे अवयव वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या वानराच्या हृदयाच्या मदतीने एक अर्भक २१ दिवस जगले होते. मात्र, त्यानंतर लोकांकडून झालेल्या टीकेमुळे शास्त्रज्ञ डुकराच्या संशोधनाकडे वळले होते.
गेल्या अनेक दशकांपासून डुकराच्या हृदयाचे वाल्व्ह मानवी शहरीरामध्ये यशस्वीरित्या वापरले गेले आहेत. तसेच चिनी डॉक्टरांनी दृष्टी पुन्हा मिळवण्यासाठी डुकराच्या कॉर्नियाचा वापर केला आहे.
अनेक बायोटेक कंपन्या अवयव प्रत्यारोपणासाठी डुकराचे योग्य अवयव विकसित करण्याच्या तयारीत आहेत जेणेकरून मानवी अवयवांची कमतरता कमी होईल. अमेरिकेत ९० हजारपेक्षा जास्त लोक मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रांगेत आहेत. अवयवाची प्रतीक्षा करताना दररोज १२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.