दिवाळीच्या तयारीसाठी धारावीचा कुंभारवाडा सजला असून सध्या येथे मोठय़ा प्रमाणात आकर्षक पणत्यांची विक्री होत आहे. धारावीतील कुंभारवाडय़ात पणत्या तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. परंपरेने आजही गुजरातमधील एक समाज या पणत्यांच्या व्यवसायात सक्रिय आहे. या परिसरात प्रामुख्याने मातीच्या साध्या पणत्या तयार केल्या जातात. तसेच, गुजरातमधून आलेल्या नक्षीदार आकाराच्या तयार पणत्यांना रंगरंगोटी करण्याचे काम येथे केले जाते. दिवाळी अवघ्या दोन आठवड्यांवर राहिली आहे. त्यामुळेच आता कारागीर सुद्धा व्यग्र आहेत. तयार माल घेण्यासाठी धारावीमध्ये राज्याच्या विविध भागांतून व्यापारी सुद्धा येत आहेत.
गतवर्षी कोरोनामुळे दिवाळी साजरी करण्यावर निर्बंध होते. त्यामुळे त्याचा फटका धारावीतील कुंभारवाड्याला मोठ्या प्रमाणावर बसला होता. यंदा मात्र कोरोनाचे मळभ काही अंश दूर झालेले असल्यामुळे, कारागीर उत्साहाने कामाला लागलेले आहेत. दिवाळीमध्ये वापरात येणारे, अनेक मातीच्या वस्तू धारावीतील कुंभारवाड्यात घडतात. यामध्ये जाळीचे आकर्षक दिवे, पणत्या आदींचा समावेश आहे. त्यामुळेच व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये जात असतो.
हे ही वाचा:
उल्हासनगरमध्ये लोक छत्री घेऊन जात आहेत शौचालयात… वाचा काय आहे कारण?
चीनने बंद करायला लावले ऍपलवरील ‘कुराण ऍप’
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
रशिया आणि ‘नाटो’ मध्ये का रे दुरावा?
व्यापारी कुंभारवाडय़ातून मोठय़ा संख्येने पणत्यांची खरेदी करतात. दिवाळीमध्ये सर्वाधिक गजबज कुंभारवाडय़ात असते. तसे पाहता वर्षभर येथे मातीच्या वस्तू तयार केल्या जातात. मात्र दिवाळीच्या दिवसात कुंभारवाडय़ातील प्रत्येक घरात पणत्या तयार करण्याचे व रंग देण्याचे काम सुरू असते. अगदी आई-बाबांबरोबरच लहान मुलेही पणत्यांना रंग देण्यात दंगलेले असतात. वीस रुपयांपासून ते अगदी पाच हजार रुपयांपर्यंतच्या पणत्या कुंभारवाड्यात विक्रीसाठी उपलब्ध असतात. पाचपणती, लामणदिवे, कॅंडल फ्लोटिंग पणती, तीन माळी पणती, रांगोळी थाळी पणती तसेच लक्ष्मीपूजनासाठी लागणारे गणपती, लक्ष्मीच्या मूर्ती, गवळणी तसेच बैलजोडी धारावीतील कुंभारवाड्यात बघायला मिळतात.