आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी म्हण आहे. त्याचा अनुभव उल्हासनगर महानगरपालिकेच्या कारभारात येत आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या शौचालयाला चक्क दरवाजेच बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लोकांना छत्री घेऊन शौचालयात जावे लागत आहे.
उल्हासनगरमधील कॅम्प २ परिसरातील हनुमाननगर झोपडपट्टीतील नागरिकांची ही वाईट अवस्था आहे.
या शौचालयांना दरवाजे बसविण्यात आले होते, पण काही दिवसांतच ते चोरीला गेले. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार करण्यात आली पण त्याचा फायदा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना आता शौचालयाला जाताना छत्री सोबत न्यावी लागते. पुरुषांबरोबरच महिलांनाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
महापालिकेने यासंदर्भात काहीही माहीत नसल्याचे समोर येते आहे. महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी या गोष्टीबद्दल आपण अनभिज्ञ असल्याचे म्हटले आहे. पण त्या शौचालयांची तात्काळ दुरुस्ती केली जाईल.
हे ही वाचा:
‘आर्यन खानची पाठराखण करणे ही लाजिरवाणी बाब’
‘२५ हजार कोटींचे रस्ते कुणाचे? “ठग्स ऑफ बीएमसी”ला कोण वाचवतंय?’
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
चीनने बंद करायला लावले ऍपलवरील ‘कुराण ऍप’
८०० कोटींचे बजेट असलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या या कारभारावर आता टीका होत आहे. जर शहरात शौचालयांची अशी अवस्था असेल आणि लोकांना छत्री घेऊन शौचालयात जावे लागत असेल तर काय म्हणावे, असा सवाल आता लोक उपस्थित करू लागले आहेत. स्वच्छ भारत, घराघरात शौचालयासारख्या योजना यशस्वी होत असताना पालिकेकडून मात्र अशा योजनांची वाताहत करण्यात येत असल्याबद्दल चर्चा सुरू आहे.