आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कपचे धुमशान सध्या ओमान आणि यूएई मध्ये सुरू आहे. या स्पर्धेत एकीकडे आठ संघांचे साखळी सामने सुरू आहेत तर उर्वरित आठ संघ सराव सामने खेळत आहेत. सोमवार, १८ ऑक्टोबर रोजी भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सराव सामना रंगला असून यात त्यांनी इंग्लंडला मात दिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज ईशान किशन याच्या ७० धावांच्या खेळीमुळे भारताने हा विजय मिळवला.
या सराव सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघातील खेळाडूंना एकत्रित ठेवण्याच्या दृष्टीने प्रथम क्षेत्ररक्षण करणे योग्य ठरेल असे कर्णधार विराट कोहली याने सांगितले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात तशी धीमी गतीने झाली. इंग्लंडचे पहिले तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले. जॉनी बेस्ट्रोव याने ३६ चेंडूत ४९ धावा करत इंग्लंडचा डाव सावरला. तर त्याला लिव्हिंगटनने ३० धावा करत त्याला चांगली साथ दिली. पुढे अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने तुफान फटकेबाजी करत २० चेंडूत ४३ धावा कुटल्या. या आधारे इंग्लंड संघाने धावफलकावर १८८ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून मोहम्मद शमीने तीन बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडले.
हे ही वाचा:
कोजागिरी पौर्णिमेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
धर्मांतरविरोधी कायदा करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी
म्हाडासाठी अर्ज करताय? मग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी ते सांगा
अमली पदार्थविरोधी कक्षाला आढळली मानखुर्द, गोवंडी ‘नशेत’
भारताकडून या सामन्यात उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून के.एल राहुल आणि ईशान किशन यांनी भारतासाठी सलामीची जबाबदारी उचलली. सुरवातीपासूनच तुफान फटकेबाजी करत या दोघांनी भारतात विजय सुकर केला. या दोघांनी ८२ धावांची भागीदारी रचली. तर के.एल.राहुल (५१) आणि ईशान किशन (७०) यांनी अर्धशतकी खेळी केली. ऋषभ पंत यांने १४ चेंडूत २९ धावा करत भारताच्या विजयावर मोहोर उमटवली. अवघ्या १९ षटकांमध्ये १९२ धावा करत भारताने ७ गडी आणि ६ चेंडू राखून विजय मिळवला.