अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट होऊन तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतर रशिया, अमेरिका आणि चीनसारख्या देशांच्या या संबंधित विषयावर सातत्याने बैठका सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारतात देखील बैठक होणार आहे. या संदर्भात दिल्लीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (एनएसए) बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान आणि रशियाला देखील निमंत्रण देण्यात आले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांना मागील आठवड्यात या बैठकीचे निमंत्रण मिळाले असल्याची मिडीयाच्या अहवालानुसार, पाकिस्तानी सुत्रांनी देखील याबाबत पुष्टी दिली आहे.
चीन, इराण, ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांनादेखील बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान भारताचे एनएसए अजित डोवाल भूषवणार असल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
जागतिक बँक भारताच्या लसीकरणाबद्दल हे म्हणाली….
‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’
‘ब्रिटीश खासदाराच्या हत्येमागे इस्लामी दहशतवादी’
या बैठकीमध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि मानवाधिकारांच्या मुद्यावर चर्चा होईल. तसेच सुरक्षा मुद्यांवरही चर्चा केली जाईल. तालिबानकडून जगाला असणाऱ्या अपेक्षा आणि तालिबानी सरकारच्या शासन प्रणालीवर चर्चा केली जाईल. तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत, अधिकार आणि शिक्षणावर देखील चर्चा होणार आहे.
भारत सरकारने दिल्लीत होणाऱ्या या बैठकीसाठी अद्याप तालिबानला निमंत्रण दिलेले नाही. तालिबानकडून सरकार प्रस्थापित करताना जनतेला आणि जगाला अनेक आश्वासने देण्यात आली होती. महिलांचे अधिकार, शिक्षण यावर कोणतेही बंधने येणार नाहीत, असेही तालिबानकडून सांगण्यात आले होते. मात्र, सरकार स्थापन झाल्यावर काही दिवसातच या सर्व आश्वासनांचा तालिबानला विसर पडल्याचे चित्र समोर आहे.