चंद्रकांत पाटील यांनी केली सडेतोड टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात महाराष्ट्रातील समस्यांबदद्ल काही बोलतील अशी अपेक्षा होती पण ते न बोलता त्यांनी भाजपाच्या नावानेच शिमगा केला. शिमग्याला वेळ असला तरी दसरा मेळाव्यात मात्र शिमगाच केला गेला, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. दसरा मेळाव्याच्या निमित्त उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्वाच्या बाबतीत उद्धव ठाकरे जे म्हणाले ते चिंताजनक आहे. कुठे होता तुम्ही स्वातंत्र्यलढ्यात असा सवाल विचारता तेव्हा आधी सांगा तुम्ही कुठे होता तेव्हा?. तुमचा तर जन्मच झालेला नव्हता. स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला तेव्हा संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी संघ स्थगित ठेवला. ते स्वतः क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी संघ स्वयंसेवकांनाही या लढ्यात उतरण्यास प्रवृत्त केले. शिवाय, आणीबाणीत तुम्ही कुठे होतात. हजारो लोक जेलमध्ये गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणात कशाचा कशाला धागा जुळत नव्हता. भारत माता की जयची तर त्यांनी चेष्टाच केली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश सुरू आहे. १० हजार कोटी दिले. त्याची फोड करा. फडणवीसांच्या काळात २०४०० रु. प्रति हेक्टर दिले. १० हजार कोटीत कुणाला किती दिले? दोन दोन वादळे आले, पिकं संपली, जमीन वाहून गेली, महिलांवर अत्याचार वाढले, पण कशाचंही गांभीर्य भाषणात दिसलं नाही, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
पंढरपूर, देगलूरला भाजपाने उमेदवार बाहेरून आणले या उद्धव ठाकरे यांच्या आरोपावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, अब्दुल सत्तार कसे आले. चिंतामण वनगा गेल्यानंतर त्यांच्या मुलाला तुम्ही पळवले. तो पराभूत झाला. तुम्ही अशा बाहेरून आणलेल्या उमेदवारांची मोठी यादी आहे. जागा शिवसेनेच्या पण उमेदवार भाजपाचे. तुम्ही केले ते तुम्ही विसरलात.
हिंदुत्व गुणवाचक आहे हे तुम्ही म्हणता मग तुमच्या आघाडीत हा गुण कुठे शिल्लक राहिला? अशी टीका करत चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राठोडनी राजीनामा दिला, आव्हाडांना अटक झाली. मुंडेनी राजीनामा द्यायला हवा होता. परबांची ईडी चौकशी सुरू आहे. अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी पडल्या. भ्रष्टाचार करणे, दोन महिलांशी संबंध ठेवणे, ज्या महिलेपासून मुले झाली त्यांना नाकारणे हे हिंदु गुणवाचक शब्द आहेत का तुमच्यासाठी?
हे ही वाचा:
यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार?
शिवसेनेनं उप-यांच्या मदतीनंच हे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलंय
उद्धव ठाकरे पुन्हा बसले हिंदुत्वाच्या लाटेवर
आर्यन खानला शाहरुखने पाठवली मनीऑर्डर
मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असा बाळासाहेबांना शब्द दिल्याचा तुम्ही उल्लेख करता, पण मुख्यमंत्री तुम्हीच झालात. जर तुम्हाला विचारांची चाड असती तर भाजपाने दगा दिल्यावर तुम्ही कुणासोबत गेला नसतात. पण सत्तेची हौस असल्यामुळे तुम्ही हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या पक्षांसोबत गेलात, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.