दिल्लीचे तख्त राखणाऱ्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातही आपले खाते उघडले आहे. लातूर जिल्ह्यातील दापक्याळ गावातील ग्रामपंचायतीत सात पैकी पाच जागा जिंकत आम आदमी पक्षाने विजयाचा गुलाल लावला आहे. आम आदमी पक्षाचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाने हा करिष्मा करून दाखवला आहे.
१५ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील १४,२३४ ग्रामपंचायतींचे मतदान झाले. राज्यातील तब्बल ३४ जिल्ह्यांमध्ये झालेल्या या मतदानात लाखो नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीची मतमोजणी आज १८ जानेवारी रोजी होत असून सर्वच पक्षांनी या निवडणुकीत आपलीच सरशी झाल्याचा दावा केला आहे. आम आदमी पक्षानेही आपले नशीब आजमावण्यासाठी आपले उमेद्वार उभे केले असून लातूर जिल्ह्यात त्यांना यश आले आहे.
आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या विजयी शिलेदारांचे अभिनंदन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून केजरीवालांनी या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा.” असे थेट मराठी भाषेतले ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा. https://t.co/F89YnNX6ZQ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 18, 2021