गेले अनेक दिवस रेल्वेतून प्रवास करणारे मासिक पासवरच अवलंबून होते. तिकीट मात्र त्यांना देण्यात येत नव्हते. त्याविरोधात लोकांमध्ये नाराजी होती. मात्र आता मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी लसीकरणाला पात्र नसलेल्या १८ वर्षांखालील सर्वांना ट्रेनचे तिकीट मिळणार असून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाही तिकीट मिळणार आहे. त्यामुळे बऱ्याच संघर्षानंतर अखेर सरकारला जाग आली आहे.
काही महिन्यांपूर्वी दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी पास दिला जात होता. मात्र, आता १४ दिवस झाल्यावर तिकीट मिळू शकणार आहे.
शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांनी शाळेत कसे पोहचायचे आणि आता २२ ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांनी प्रवास कसा करायचा हा प्रश्न अनेक स्तरांमधून विचारण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ज्यांना प्रकृतीमुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास परवानगी नसल्यास डॉक्टरांच्या मेडिकल सर्टिफिकेटवर अशा नागरिकांना तिकीट घेता येणार आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा!
काश्मीरमध्ये चकमक सुरूच; एका अधिकाऱ्याला आणि जवानाला वीरमरण
सरसंघचालकांनी केले अखंड भारताचे सूतोवाच
भारत लसीकरणाच्या नव्या शिखराकडे!
ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, मासिक पास घेणे बंधनकारक असल्यामुळे काही नागरिकांना एक किंवा दोनवेळाच प्रवास करायचा असल्यास त्यांना पासच्या खर्चाचा भुर्दंड पडत होता. तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली होती. सुरुवातीपासूनच तिकीट देण्यात यावी अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून सुरू होती.