आज शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर न घेता तो षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. मात्र, ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार दसरा मेळाव्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सभागृहातील उपस्थितांची संख्या कमाल २०० इतकी ठेवण्यात आली होती. मात्र आता अचानक हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
निर्बंध शिथिलीकरणामुळे आता एक हजार शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार, अशी माहिती कळते. सामान्य जनतेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असताना अचानक या नियमांमध्ये शिथिलता का आणली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसाठी अनेक निर्बंध लादले आहेत. रेल्वे प्रवासावर बंदी असून केवळ लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. नुकतेच पार पडलेले गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठीही सरकारकडून कठोर निर्बंध लादण्यात आले होते.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील सरकारी बंद विरोधात उच्च न्यायलायत याचिका
… म्हणून मुंबई पोलीस समीर वानखेडेंना समन्स पाठवणार
भारत लसीकरणाच्या नव्या शिखराकडे!
दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करताना देखील नियमांचे पालन करूनच खुल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षकांना लसीचे दोन्ही डोस घेण्याचेही बंधन घालण्यात आले आहेत. दसरा मेळाव्याला उपस्थितांची वाढवलेली संख्या लक्षात घेता तिथेही लसीकरणाचा नियम लागू करण्यात आला आहे की नाही, सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालनही केले जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज सायंकाळी हा दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि ईडीच्या धाडसत्राच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.