मुंबई पोलिसांचा साध्या वेशातील पोलीस पाळत ठेवत असल्याचा एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आरोप केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठविणार आहे. तक्रारीचा भाग म्हणून समीर वानखेडे यांची चौकशी केली जाईल.
समीर वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले होते. त्यांच्यावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. निधनानंतर नियमितपणे वानखेडे हे या स्मशानभूमीत जातात. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्मशानभूमीत गेले असता कुणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवत तक्रार केली होती. पाळत ठेवणाऱ्यांमध्ये मुंबई पोलीस दलातील दोन अधिकारी असल्याचाही त्यांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांचीही भेट घेऊन स्वत:च्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती.
हे ही वाचा:
नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?
आर्यन खान आणखी ६ दिवस तुरुंगातच
‘कोण जाणे पवारांना कसली वेदना आहे?’
जावयाच्या बचावासाठी नवाब मलिक रिंगणात
दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावर अशी पाळत ठेवण्याबाबत पोलिसांना वा राज्य गुप्तचर विभागाला कोणतेही आदेश सरकारने दिलेले नाहीत, असे वळसे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त याप्रकरणी चौकशी करणार असून सात दिवसांत त्यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणात ज्यांच्यावर वानखेडे यांचा संशय आहे त्यांची चौकशी होणार असून वानखेडे यांचाही जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. त्यासाठी समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे.
क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणामुळे समीर वानखेडे हे सध्या प्रकाशझोतात असून वानखेडे यांच्या निर्देशानुसारच एनसीबीच्या पथकाने क्रूझवर छापा टाकला होता व तिथून ड्रग्स जप्त केले होते. या प्रकरणात आर्यन खान याच्यासह २० जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या हायप्रोफाइल प्रकरणात तपास सुरू असतानाच वानखेडे यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे.