‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहिणींच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमवली आहे. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही’ असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात घोटाळा झालेला आहे, म्हणूनच आयकर विभागाने कारवाई केली असे सोमैय्या यांनी म्हटले आहे. बुधवार, १३ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन सोमैय्यांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
आयकर विभागाच्या धाडींनंतर अजित पवारांनी भावूक विधान करत ‘बहिणींच्या घरी धाडी टाकल्या’ असे म्हटले. पण बहिणींच्या घरी धाडी का पडल्या? असा सवाल सोमैय्या यांनी केला आहे. बहिणींच्या नावाने बेनामी संपत्ती गोळा करणे हे दुर्दैवी आहे असे सोमैय्या म्हणाले.
हे ही वाचा:
मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या
‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा टंचाईचे संकट’
…म्हणे मावळमधील गोळीबार भाजपाने भडकाविल्यामुळे!
काय आहे १०० लाख कोटींची गती शक्ती योजना?
‘जरंडेश्वरचे जे मुख्य मालक आहेत, भागधारक आहेत त्यात एक नाव मोहन पाटील यांचे आहे. मोहन पाटील हे विजया पाटील यांचे पती आहेत. तर नीता पाटील यांचे देखील नाव यात आहे. मी पवारांना विचारू इच्छितो की हे नीता, मोहन आणि विजया पाटील आहेत तरी कोण? विजया आणि निता या अजित पवारांच्या बहिणी आहेत असे मला सांगण्यात आले. तर मोहन हे विजया पाटील यांचे पती असल्याची माहिती मिळाली. आता यासंदर्भात अजित पवार यांनीच खुलासा करावा’ असे सोमैय्या यांनी म्हटले आहे
तर जरंडेश्वरचे ९०% शेअर्स हे ‘स्पार्किंग सोईल’ कडे आहेत. या कंपनीचे मालक अजित अनंतराव पवार आणि सूनेत्रा अजित पवार हे आहेत. या कंपन्यांच्या गुंतवणुकीमध्ये ५७ नामी बेनामी कंपन्या आहेत. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या इतर सहकार्यांवर आयकर विभागाने केलेली कारवाई ही भारतातील सगळ्यात मोठी धाड असल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे. यावर नेटफ्लिक्सने काही सिरीज बनवली तर अजित पवार यांना कमीत कमी दोन ते तीन कोटी रुपये रॉयल्टी मिळू शकेल असा टोलाही सोमैय्या यांनी लगावला आहे.