इगतपुरी स्थानकानंतर ट्रेन लांब बोगद्यात शिरली असता दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत जनरल बोगीतील प्रवाशांना बेल्ट आणि धातूच्या शस्त्रांच्या मदतीने धमकावून प्रवाशांकडील सामान त्यांना देण्यास भाग पाडले, अशी माहिती प्रवाशांनी ‘टाइम्स’शी बोलताना दिली. शुक्रवारी (८ ऑक्टोबर) रात्री धावत्या लखनऊ- मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये एका टोळीने दरोडा टाकला होता आणि एका २० वर्षीय महिलेवर बलात्कारही केला होता.
जेव्हा दरोडेखोरांनी तरुणीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या पतीने आणि काही सहप्रवाशांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. चार आरोपींना गुन्हा घडल्यावर लगेच पकडण्यात आले होते, तर पाचव्या आरोपीला शनिवारी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. हे आरोपी इगतपुरी आणि मुंबईचे आहेत. जनरल बोगीत सुरक्षा जवान क्वचित जातात हेच लक्षात घेऊन या आरोपींनी जनरल बोगीला लक्ष्य केले असावे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
या दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या २१ वर्षीय अंकुश कुमार याला दरोडेखोरांनी ट्रेनच्या बाहेर ढकलून दिले होते, पण काही वेळापूर्वीच अन्य एका प्रवाशाने आपत्कालीन साखळी खेचली असल्यामुळे ट्रेनचा वेग कमी होता त्यामुळे कुमार याला दुखापत झाली नाही. ‘दरोडेखोरांनी माझा मोबाईल खेचून घेतला आणि मला बाहेर ढकलून दिले. मात्र ट्रेनचा वेग कमी असल्याने दुसऱ्या एका डब्यातून अन्य प्रवाशाने मदतीला हात दिल्यामुळे मी पुन्हा ट्रेनमध्ये चढू शकलो’, असे अंकुश कुमार याने ‘टाइम्स’शी बोलताना सांगितले.
हे ही वाचा:
शिष्यवृत्तीच नाही, फिजिओथेरपिचे निवासी डॉक्टरही संपावर
भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी प. बंगालमध्ये ११ जणे अटकेत
नवाब मलिकांची मती भंगार मध्ये गेलेली
भाजपा कार्यकर्त्यांची हत्या ही प्रतिक्रिया; टिकैत यांच्याकडून हत्येचे अप्रत्यक्षपणे समर्थन
दरम्यान पुढील कसारा स्थानकात रेल्वे पोलीस फोर्स आणि लोहमार्ग पोलीस आरोपींना पकडण्यासाठी सज्ज होते. तरीही काही आरोपींनी पळ काढला. मात्र एका आरोपीला पोलिसांनी स्थानकातून अटक केली. ट्रेनने कसारा स्थानक सोडल्यानंतर प्रवाशांच्या असे लक्षात आले की, त्यांच्यापैकी एक जण अजूनही बोगीच्या शौचालयात लपून बसला आहे. तेव्हा प्रवाशांनी त्याला बाहेरून बंद केले आणि ट्रेन कल्याण स्थानकात येताच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
ट्रेनमधील बलात्कार प्रकरणाची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी इगतपुरी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर अजून दोन आरोपींना पकडण्यात आले त्यात महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींचाही समावेश होता. अर्षद शेख (१९) रा. मालाड, प्रकाश पारधी उर्फ पक्या (२०), अर्जुन परदेशी (२०) आणि किशोर सोनावणे उर्फ काळू (२५) हे रा. इगतपुरी, अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक केलेल्या पाचही आरोपींवर बलात्कार, दरोडा आणि अन्य इतर कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार यातील काही आरोपींच्या नावे आधीही काही गुन्हे दाखल झालेले आहेत.