नारायण राणे यांनी केला घणाघात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कुणी केला, हे लोकांना चांगले ठाऊक आहे. जेव्हा मी आणि सुरेश प्रभू इथे २००९मध्ये भूमिपूजनासाठी आलो तेव्हा या विमानतळाला विरोध कुणी केला, जमीन हस्तांतरित करणार नाही, म्हणून कुणी घोषणा दिल्या हे लोकांना ठाऊक आहे. हायवे होत होता त्यावेळीही त्याविरोधात आंदोलने झाली, ती कुणी केली, हे लोकांना माहीत आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळ उद्घाटनप्रसंगी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर शरसंधान केले.
चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे या उद्घाटनाची सर्वाधिक चर्चा माध्यमात होती.
नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील विकासाचे श्रेय आपलेच असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा माझ्या जीवनातील आनंदाचा दिवस आहे. कोणतेही राजकारण करू नये, असे मला वाटत होते. इथे आल्यावर उडणारे विमान बघावे असे वाटत होते. या विमानतळाच्या निमित्ताने परदेशी लोक यावेत, त्यांनी भरपूर खर्च करावा, सिंधुदुर्गातील लोकांना तो पैसा मिळावा व आर्थिक समृद्धी यावी या उद्देशाने मी प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरेंनी मला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठवले. मी ९० साली तिथे निवडून आलो. लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. या जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या अडीअडचणीला कोण मदतीला येते, हे लोकांना ठाऊक आहे.
हे ही वाचा:
खो- खोपटू सारिका काळेने आपल्यावरील चित्रपटाचे मानधन खेळाडूंसाठी का दिले?
‘पुष्पक एक्सप्रेस’ मध्ये दरोडा आणि सामूहिक बलात्कार
‘बेस्ट’चे चालक आता भाड्याने मिळणार!
कोरोना योद्ध्यांना ठाकरे सरकार कधी ‘सन्मान’ देणार?
नारायण राणे यांनी विमानतळाच्या अवतीभवती नसलेल्या सुविधांचीही जाणीव करून दिली. विमानतळावर उतरल्यावर काय पाहावे तर खड्डे. एमआयडीसीने हे काम आधीच करायला हवे होते. हा सुभाष देसाईंचा कार्यक्रम आहे का, कार्यक्रमासाठी काही शिष्टाचार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कार्यक्रम सरकारी असल्यामुळे तसा शिष्टाचार पाळला जायला हवा होता, असे राणे म्हणाले.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी कानपिचक्या दिल्या. आदित्य यांनी सिंधुदुर्ग विकासासाठी तयार केलेला टाटा इन्स्टिट्यूटने तयार केलेला अहवाल वाचावा. कर्तबगारी दाखवावी मला त्याचा आनंद वाटेल. ते माझ्यासाठी ‘टॅक्स फ्री’ आहेत.
गोडवा आत्मसात करा
नारायण राणे यावेळी म्हणाले की, मला विमानात खासदार विनायक राऊत यांनी पेढा दिला. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, पेढा गोड आहे, त्यातला गोडवा आत्मसात करा.
ज्योतिरादित्यांचे मराठीत भाषण
यावेळी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचेही ऑनलाइन भाषण झाले. त्यावेळी त्यांनी संपूर्ण मराठीत भाषण करून सिंधुदुर्गाची वैशिष्ट्ये सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास आपण लक्षात ठेवून काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.