महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच आहे. सात आणि आठ ऑक्टोबरनंतर आज म्हणजेच शनिवार, ९ ऑक्टोबर रोजी देखील अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाचे छापे सुरू असल्याचे दिसत आहे. आयकर विभागाकडून अजित पवार आणि त्यांच्या बहिणींच्या घरी तसेच कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली.
अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. या कारवाईचा हा सलग तिसरा दिवस आहे. अजित पवारांच्या कोल्हापूर येथील भगिनी विजया पाटील तर पुण्यातील भगिनी नीता पाटील आणि रजनी इंदुलकर यांच्यावर आयकर विभागाची धाड पडली आहे.
हे ही वाचा:
चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी होणार राजकीय उड्डाण?
रतन टाटांनी केले मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक
वसुली म्हटली की ‘ससा’ आणि शेतकऱ्यांना मदत म्हटल्यावर ‘कासव’…असे हे ठाकरे सरकार!
चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीवर एनसीबीचे छापे! हजर राहण्याचे समन्स
पुण्याजवळील दौंड येथील ‘दौंड शुगर’ या साखर कारखान्यात आयकर विभागाचे पथक पोहोचले असून गेल्या तीन दिवसांपासून या कारखान्यावर आयकर विभागाची जोरदार तपासणी सुरू आहे. तर अहमदनगर येथील अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी देखील आयकर विभागाचे पथक कारवाई करताना दिसत आहे.
यासोबतच राज्यभर गाजत असलेला सातारा येथील ‘जरंडेश्वर साखर कारखाना’ आणि नंदुरबारमधील ‘पुष्प दंतेश्वर साखर कारखाना’ याठिकाणीही आयकर विभाग कसून तपास करताना दिसत आहे. तर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मुंबई येथील कार्यालयातही आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.