मानखुर्दच्या खाडीपट्ट्यालगतच्या झोपड्यांमध्ये भराव टाकण्याचे प्रमाण हे दिवसागणिक वाढत आहे. खाडीमध्ये भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे खाडीलगतचा परिसर हा मोकळा करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. नाल्यांच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीला हलवून त्याजागी सेवा रस्ता बनवून ब्रिमस्टोवेड ही संकल्पना राबविण्याचा विचार होत आहे. परंतु झोपडपट्टी माफिया त्याविरोधात उभे राहिलेले आहेत.
मानखुर्दमध्ये झोपडपट्टीमाफीयांनी अक्षरशः बेकायदा बांधकामांचे सत्र चालवले आहे. मानखुर्द येथील मंडाळा झोपडपट्टीमध्ये नाल्यामध्ये भराव टाकला जात आहे. वाशी खाडीला जोडलेला हा नाला असून, यामध्ये बेकायदा भराव टाकला जात आहे. तसेच भरावाच्या गोण्या रचून जमीन तयार करणे आता सुरू झालेले आहे. त्यामुळेच यावर नंतर झोपड्या उभ्या राहतात हे असे सहज घडत आहे.
बेकायदा झोपड्यांबाबत इथे कुणीही ब्र काढत नाही. २६ जुलै २००५ मध्ये शहरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पालिकेने ब्रिमस्टोवेड प्रकल्पाची संकल्पना अमलात आणण्याचे ठरवले होते. त्याच अनुषंगाने नाल्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड बनविण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. म्हणजे पूरपरिस्थिती आल्यावर बचावकार्य करणे सोपे होईल. परंतु याच नाल्याच्या कडेला आता अतिक्रमणे अधिक प्रमाणात वाढू लागेलेली आहेत.
हे ही वाचा:
महिलांसाठी हा घेण्यात आला ‘बेस्ट’ निर्णय
महाराष्ट्रात १०५० कोटींचा भ्रष्टाचार
जे जे इन्स्टिट्यूटमधून गायब झाले कॅमेरे, महागड्या लेन्स
प्रशासनही गाफील राहूनच हे सर्व केवळ बघत आहे. प्रशासनाची बघ्याची भूमिका असल्यामुळे, झोपडपट्टीमाफीया चांगलेच निर्ढावलेले आहेत. या सर्व गोष्टींमध्ये झोपडपट्टीमाफियांना नेमकं कोण अभय देत आहे हा मूळ मुद्दा आता उपस्थित होतोय. मुख्य म्हणजे या अतिक्रमणामुळे नाल्याला चांगलाच अडथळा निर्माण होत आहे. तसेच जवळच असलेल्या फ्लेमिंगो अभयारण्यावर याचा चांगलाच दुष्परिणाम होऊ लागला आहे.