देशात घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्यावर मुंबई एटीएसने रविवारी (१९ सप्टेंबर) मुंब्र्यातून रिझवान मोमीन याला अटक केली. जोगेश्वरी येथून ताब्यात घेतलेल्या झाकीर हुसेन शेख याच्या चौकशीतून रिझवान याचे नाव समोर आले होते. रिझवान आणि झाकीर दोघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांचा ताबा दिल्ली पोलीस घेणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रिझवानच्या अटकेनंतर गेल्या काही वर्षांपासून दहशतवाद्यांचा अड्डा म्हणून ओळखले जाणारे मुंब्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दहशतवाद आणि मुंब्रा कनेक्शन
- मुंब्रा- कौसा परिसरातून सिमी संघटनेच्या सहा हस्तकांना पोलिसांनी २४ ऑगस्ट २००१ रोजी अटक केली होती.
- संसदेवरील हल्ल्याप्रकरणी कुख्यात अबू हाजमा याला मुंब्रा येथून २० डिसेंबर २००१ रोजी अटक करण्यात आली होती.
- मुंब्रा येथील वफा पार्कवर धाड टाकून पोलिसांनी १६ मार्च २००२ रोजी कुख्यात हिजबुल मुझाहिद्दिन या संघटनेच्या चार अतिरेक्यांना अटक केली होती.
- मुंब्र्यातून ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १७ एप्रिल २००३ रोजी लष्कर – ए – तोयबाच्या दोन अतिरेक्यांना अटक केली होती.
- मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी कुख्यात साकीब नाचन याला घातक रसायन पुरवणारा मोहम्मद नैमुद्दीन या व्यावसायिकाला पोलिसांनी मुंब्रा येथून १६ मे २००३ रोजी उचलले होते.
- भाजप आणि संघ परिवाराच्या वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंब्रा परिसरातून १० ऑक्टोबर २००३ रोजी पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती.
- ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने एकाला अटक केली होती, तो देखील मुंब्र्यात बराच काळ वास्तव्यास होता.
- गुजरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेली इसरत शेख ही देखील मुंब्रा परिसरात रहायला होती.
- इसिसचा हिंदुस्थानातील म्होरक्या मुदब्बीर शेख हा कित्येक वर्षे मुंब्र्यात रहायला होता. मुंब्र्यात राहून देशभरातील इसिसच्या हस्तकांशी तो संपर्क ठेवत होता. २०१६ मध्ये त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले होते.
मुंबईपासून जवळ असलेल्या मुंब्रा- कौसा परिसरातून गेल्या २० ते २५ वर्षांत सिमी, लष्कर – ए – तोयबा, हिझबुल मुझाहिद्दिन, इसिस अशा विविध अतिरेकी संघटनांचे हस्तक एनआयए, एटीएस, गुन्हे शाखेने गजाआड केले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महत्वाच्या शहरांचे मध्य असलेल्या मुंब्र्यात डोंगर टेकड्यांवरील दाटीवाटीचा असलेला परिसर म्हणजे अशांसाठी आश्रयस्थान बनला होता. मात्र आता नव्याने तयार होत असलेल्या गृहसंकुलात भाड्याने घर घेऊन या हस्तकांनी त्यांचे नेटवर्क अॅक्टिव्हेट केले आहे.
हे ही वाचा:
हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द
१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका
… आणि केरळमध्ये पार पडला ‘श्वान’दार लग्नसोहळा
कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावा
नुकताच एटीएसने ताब्यात घेतेलेला रिझवान देखील कौसा येथील चांदनगर असणाऱ्या अवोन नुरी रेसिडन्सीमध्ये एक महिन्यापासून वास्तव्याला होता. रिझवान हा पूर्वी मुंबईत शिक्षक म्हणून नोकरीला होता आणि आता तो खासगी शिकवणी वर्ग चालवत असे. २०१९ मध्ये इसिसची फौज बनवणाऱ्या तलाह उर्फ अबू बकार हनीफ पोतरिक (२४) याला अशाच उच्चभ्रू अशा दोस्ती प्लॅनेटच्या एमरॉल्ड टॉवरमधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळेच मुंब्र्याच्या झोपडपट्टीत आणि गल्लीबोळात दिसणारे हे हस्तक आता सोसायट्या आणि टॉवरमध्ये दिसू लागले आहेत.