अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस गुंतागुतीची होत चालली आहे. इथे कोण कोणाच्या बाजूने आहे आणि कोणाची काय भूमिका आहे याविषयीचा गोंधळ वाढतच चालला आहे. तालिबान्यांचा अंतर्गत सत्ता संघर्ष आता अधिक तीव्र होत रक्तरंजित होत चालला आहे. अफगाणिस्तानातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. इंग्लंडच्या एका मासिकाने दावा केला आहे की सत्तेच्या या संघर्षात तालिबानचा सर्वेसर्वा हैबतुल्लाह अखुंदजादा याचा मृत्यू झाला आहे. अखुंदजादाचा खून करण्यात आला आहे. तर तालिबानचा दुसरा महत्त्वाचा नेता आणि उपपंतप्रधान मुल्ला बरादर याला कैदेत ठेवण्यात आले आहे. सत्ता हस्तगत करण्यासाठी तालिबानच्या दोन गटात संघर्ष होतो आहे. या ब्रिटिश मासिकाने हेदेखील म्हटले आहे की हक्कानी गटाबरोबरच्या या संघर्षात सर्वाधिक नुकसान मुल्ला बरादर याला झाला आहे.
ब्रिटिश मासिकात आलेल्या वृत्तानुसार सप्टेंबर महिन्यात तालिबानच्या दोन्ही गटात बैठक झाली होती. या बैठकीत एक वेळ अशी आली होती की हक्कानी गटाचा नेता खलील-उल-रहमान हक्कानी आपल्या खुर्चीतून उभा राहिला आणि त्याने मुल्ला बरादरला मुक्के मारण्यास सुरूवात केली. मुल्ला बरादर सातत्याने तालिबान सरकारच्या कॅबिनेटमध्ये बिगर तालिबानी आणि अल्पसंख्यांकांना स्थान देण्यासंदर्भात आग्रह धरत होता. असे केल्याने जगभरातील इतर देश तालिबान सरकारला मान्यता देईल असे त्याचे मत होते.
तालिबान्यांच्या बैठकीत खलील-उल-रहमान हक्कानी आणि मुल्ला बरादर यांच्या झालेल्या मारामारीनंतर मुल्ला बरादर काही दिवस बेपत्ता झाला होता. आता त्याला कंदहारमध्ये पाहण्यात आले आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार बरादरने अफगाणिस्तानातील स्थानिक कबिल्यांच्या नेत्यांशी गाठभेट घेत चर्चा केली आहे. या कबिल्यांचा त्याला पाठिंबादेखील आहे. अर्थात बरादरवर दबाव आणण्यासाठी विरोधी गटाकडून व्हिडिओ संदेश जाहीर करण्यात आला होता. ब्रिटिश मासिकाच्या दाव्यानुसार या व्हिडिओतून असे संकेत मिळत आहेत की बरादरला कैद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द
१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका
जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला
कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावा
बरादरचा प्रयत्न होता की तालिबानचे एक चांगले चित्र जगासमोर आणावे जेणेकरून तालिबान सरकारला जग मान्यता देईल. तर दुसरी हक्कानी नेटवर्क मात्र आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यांना प्रोत्साहन देते आहे. अफगाणिस्तानातील निर्वासितांसाठीचे मंत्री खलील हक्कानी यांचा समावेश संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या दहशतवाद्यांच्या यादीत केला आहे. या सर्व घटनांसंदर्भात एक मुद्दा असादेखील आहे की हक्कानी गटाचे सरळ संबंध आयएसआय आणि पाकिस्तानशी आहेत. पाकिस्तानदेखील तालिबान सरकारमध्ये हक्कानी गटाचेच वर्चस्व स्थापित करू इच्छिते. अफगाणिस्तानमधील आपला हेतू साध्य करणे त्यामुळे पाकिस्तानला सोपे होणार आहे.