मुंबईचे रस्ते म्हणजे सध्याच्या घडीला प्रचंड वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध झालेले आहेत. सर्वसामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होताहेत. एकीकडे सर्व कार्यालये सुरु झालेली आहेत. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडले की प्रत्येकाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
लोकलमुभा सरसकट सर्वांना नसल्यामुळे, अनेकांना आता रस्ते मार्गाशिवाय पर्याय उरलेला नाही. तसेच जागोजागी असलेले खड्डे वाहतूक कोंडीस कारणीभूत आहेत. पूर्व मुक्त मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग यामुख्य रस्त्यांसह शहरातील अनेक आतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेली आहे.
अरुंद रस्ते, खासगी वाहनांची वाढती संख्या यामुळे मुंबई-ठाणे परिसरातील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी दिसून येते. मुंबई-ठाणे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे ठाणे जिल्हा अक्षरशः गुदमरला आहे. वाहतूक विभाग व परिवहन विभागाच्या नियोजनाअभावी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर जागोजागी खोदकाम होत असल्याने पादचार्यांना चालण्यासाठी मोकळा रस्ता उपलब्ध होत नसून याला संबंधित सुस्त यंत्रणा कारणीभूत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणातही वाढ होत असून आरोग्याचा प्रश्न देखील आ वासून उभा आहे.
हे ही वाचा:
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी लपवले ‘हे’ उत्पन्न
१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका
चक्क कुत्र्यासाठी विमानात बुक केला बिझनेस क्लास
कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावा
वाहतुकीची जटील समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. त्यातील बहुसंख्य प्रकल्प रखडले किंवा फक्त कागदावरच राहिलेले आहेत. शहरातील अरुंद रस्ते महापालिकेच्या माध्यमातून काही अंशी रुंद झाले असले तरी शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी वाढतच आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम देखील प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे व प्रशासकीय परवानग्या वेळेत न मिळाल्याने अतिशय संथ गतीने सुरू आहे.