गणरायाला निरोप देताना मनात काहूर माजतं. आपला लाडका बाप्पा तब्बल दहा दिवस विराजमान झाला असताना, निरोप देणं जड जातं. कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. रविवारी अनंत चतुर्दशी असून महापालिकेने विसर्जनासाठी सर्व व्यवस्था केली आहे.
या व्यवस्थेंतर्गत २४ विभागांमध्ये २५ हजार कामगार, कर्मचारी, अधिकारी हे मुंबईकरांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी कर्तव्यासाठी उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली. गर्दी टाळण्यासाठी १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून, विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्थळे कार्यरत आहेत.
७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळे असून, या ठिकाणी महापालिकेद्वारे आवश्यक व्यवस्था आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोविडच्या पाश्र्वभुमीवर गणपती विसर्जन होणार आहे.त्यामुळे यंदाही भाविकांना स्वत: विसर्जन करण्याची परवानगी नाही.त्यासाठी कृत्रिम विसर्जन स्थळे तसेच नैसर्गिक विसर्जन स्थळांवर मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले आहेत. या केंद्रांमध्ये मूर्ती दान करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
‘अपमानित’ कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा
…आणि भाईगिरीतून मित्रानेच केली मित्राची हत्या!
बनावट छाप्याच्या नाट्यामुळे अंगावर आला काटा!
टी २० वर्ल्डकपनंतर कुंबळे प्रशिक्षकपद स्वीकारणार?
२४ प्रभागात साधारण २५ हजार कर्मचारी अधिकारी तैनात आहेत. चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्रकिनाऱ्यावरील भुसभुशीत रेतीत अडकू नये यासाठी नैसर्गिक विसर्जनस्थळी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्यवस्था करून तात्पुरते मार्ग तयार करण्यात आले आहेत. ३३८ निर्माल्य कलश त्याचबरोबरीने १८२ निर्माल्य वाहनांची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटरबोट व ३० जर्मन तराफा इत्यादी सेवा-सुविधा व साधनसामग्रींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विविध ठिकाणी संरक्षण कठड्यांच्या व्यवस्थेसह विद्युत व्यवस्था केली आहे.