26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणभारताची राजकीय संस्कृती बदलणारा नेता

भारताची राजकीय संस्कृती बदलणारा नेता

Google News Follow

Related

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस. २००१ साली कुठलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना हा नेता थेट गुजरातच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाला आणि तेव्हापासून देशाच्या राजकीय पटलावर मोदी पर्वाची सुरुवात झाली. गेल्या वीस वर्षापासून हा अश्वमेध आजही तसाच सुरू आहे. नरेंद्र मोदींच्या राजकारणाचा उहापोह, विश्लेषण आजवर अनेकांनी केले. यापुढेही ते होत राहील. पण नरेंद्र मोदींचे भारतीय राजकारणाच्या दृष्टीने सर्वात मोठे योगदान जर काही असेल तर ते म्हणजे त्यांनी बदललेली भारताची राजकीय संस्कृती!

भारतात राजकीय नेता, पुढारी म्हणजे खूप कोणीतरी असामान्य व्यक्तिमत्व असल्याचा आभास कायम निर्माण केला जातो. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असे नेते हे ‘मी कोणी तरी खूप मोठा व्यक्ती आहे’ अशा आवेशात, आवेगात वावरत असतात. मोदींनी सत्तारूढ झाल्यापासून या प्रकारच्या राजकीत संस्कृतीला मुळापासून उखडून फेकण्याचा प्रयत्न केला आहे आणि बऱ्याच प्रमाणात ते यशस्वीही झाले आहेत.

यात अगदी लाल दिव्याच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णयही समाविष्ट आहे. आपल्या देशात लाल दिव्याला बरेच महत्त्व होते. केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, सरकारी अधिकारी ज्यात जिल्हाधिकारी, आयुक्त असे सर्वच जण आले. हे सारेच लाल दिव्याची गाडी घेऊन फिरायचे. विविध कोर्टाचे न्यायाधीशही त्यात होते. लाल दिव्याच्या गाड्या रस्त्यावरून धावू लागल्या की एखादी अतिमहत्त्वाची व्यक्ती जात आहे हे सर्वांना या दिव्यातून आणि दिव्याचा आवाज करून सांगितले जायचे. सर्वसामान्यांच्या गाड्या अडवून या गाड्यांना प्राधान्य दिले जायचे. नरेंद्र मोदींनी हा दिवा कायमचा मालवून टाकला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष अशा काही महत्त्वाच्या चार ते पाच व्यक्ती सोडता इतर कोणालाही लाल दिवा वापरायची परवानगी नाही असा निर्णय मोदींच्या सरकारने घेतला. भारतात रुजलेली व्हीआयपी संस्कृती मोडीत काढण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल होते.

मोदींचा ‘मन की बात’ हा देखील असाच एक उपक्रम. देशाची जनता आणि देशाच्या प्रमुख पदी सत्तारूढ असणारे राजकीय नेते यांच्यात दर पाच वर्षांनी निवडणुकांच्या वेळी होणारा संवाद मोदींनी नित्याचा केला. आपण आपल्या देशाच्या प्रमुखांची थेट संवाद साधू शकतो, आपले विचार, आपल्या कल्पना मांडू शकतो त्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध आहे हा विश्वास देशाच्या जनतेला या संवादातून मिळाला. पंतप्रधान हे पद जरी मोठे असले तरी तरी त्या पदावर बसलेली व्यक्ती ही सर्वसामान्यांतीलच एक आहे ही भावना जनतेच्या मनात मोदींनी निर्माण केली.

एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी या सर्वसामान्यांमधील असामान्यांना शोधून त्यांचा गौरव देखील केला आणि तो सुद्धा थेट पद्म पुरस्कार देऊन. २०१४ च्या आधीची आपण पद्म पुरस्काराच्या मानकऱ्यांची यादी बघितली. तर त्यात वशिलेबाजीने पदरात पुरस्कार पाडून घेतलेल्या अनेकांचा भरणा दिसतो. यात नेते, अभिनेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते हे सारेच होते.

मोदींनी या प्रक्रियेला छेद दिला. मोदी सरकार आल्यापासून पद्म पुरस्काराचे मानकरी ठरणारे नागरिक अतिशय सामान्य पार्श्वभूमीचे असतात. अनेकदा तर त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांचे नाव आणि कार्य लोकांसमोर येते. देशभरातील अशा अनेक कर्मयोग्यांचा यथोचित सन्मान करण्याचा पायंडा मोदींनी घालून दिला. व्यक्तीचा गौरव न करता तिच्या कार्याचा गौरव करायला मोदींनी सुरूवात केली.

हे ही वाचा:

विराट कोहलीने केले होते रोहित शर्माला डावलण्याचे प्रयत्न

धक्कादायक: दहा डीसीपींकडून गोळा केले ४० कोटी रुपये

बीकेसीमध्ये ‘हा’ पूल कोसळला

सेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर

नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सुरू झालेल्या सरकारी योजनांकडे जर आपण पाहिले तरीही व्यवस्था परिवर्तनाचा केलेला प्रयत्न आपल्याला दिसून येतो. आपल्या देशात सत्तारूढ झालेल्या प्रत्येक सरकारनेच आजवर निरनिराळ्या योजना सुरु केल्या आहेत. पण तरीही मोदींच्या योजना वेगळ्या ठरतात कारण मोदींच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनांची नावे ही ‘प्रधानमंत्री…..योजना’ अशा प्रकारची आहेत. आपल्या देशात सुरू झालेल्या योजनांना व्यक्तींची नावे देण्याचा जो एक प्रगाध होता तो बऱ्याच प्रमाणात संपवण्यात आला. प्रधानमंत्री हे या देशाचे एक महत्त्वाचे पद आहे त्या पदावर बसणारी व्यक्ती बदलू शकते पण ते पद कायम राहणार. याच भावनेतून व्यक्ती महात्म्यापेक्षा त्या पदाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा निर्णय मोदींनी घेतला.

गेले दोन महिने ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या निमित्ताने त्यांनी खेळाडूंशी फोनवरून साधलेला संवाद आणि त्यांच्या अभिनंदनासाठी आयोजित केलेला कार्यक्रम हा देखील असाच एक अभिनव उपक्रम ठरला. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू हा आपल्या देशाचा सांस्कृतिक अँबेसिडर आहे ही भावना व्यक्त करणारे मोदी बहुदा पहिलेच राजकीय नेते असावेत. देशाची मान उंचावणाऱ्या या खेळाडूंची दखल थेट देशाच्या प्रमुख नेत्याने घेणे हे साऱ्या जगाला एक आदर्श घालून देणारे होते. याची इतकी चर्चा झाली की परदेशातील खेळाडूही मोदींच्या या कृतीसाठी त्यांचे कौतुक करताना दिसले.

पंतप्रधान झाल्यावर मोदींनी देशाची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील ज्या नकारात्मक गोष्टींबद्दल जगभर बोलले जात होते त्या गोष्टींमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांचा मानस दिसतो. बरं हे करत असताना ते फक्त घोषणा करत नाहीत ‘लिडिंग फ्रॉम द फ्रंट’ या उक्तीनुसार ते स्वतः करतात आणि मग जनतेलाही ती गोष्ट करण्याचे आवाहन करतात. स्वच्छ भारत, योग दिवस ही अशीच उदाहरणे!

देशाचा पंतप्रधान हातात झाडू घेऊन रस्त्याची सफाई करेल याचा विचार खरंच कोणत्या भारतीयाने कधी केला नसेल. पण मोदींनो ते करून दाखवले. योग दिनाच्या बाबतीतही हेच म्हणावे लागेल. भारताच्या मातीत जन्माला आलेला ‘योग’ हा जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जावा अशी कल्पना मोदींनी जेव्हा मांडली, तेव्हा जगभरातील बहुतांश देशांनी एक मताने त्याला पाठिंबा दिला.

तेव्हापासून २१ जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा व्हायला लागला. पण मोदींनी ही देखील संधी साधत देशाची संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. उदाहरण घ्यायचे झाले तर मोदी जेव्हा योग करतात तेव्हा त्यांच्या गळ्यात असामी गमचा असतो. मोदींचे योग करतानाचे फोटो, व्हिडिओ जगभरातील माध्यमे प्रसारित करतात त्यामुळे केवळ मोदींची प्रसिद्धी होत नाही तर आसामचा गमचाही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. असे अनेक अनेक छोटे-मोठे बदल आणि कृती करून मोदींनी भारताच्या राजकीय संस्कृतीत परिवर्तन करायला सुरुवात केली आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाने अनुभवलेली आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांची देशहिताशी तडजोड न करण्याची वृत्ती. आपल्या देशात एक अशी राजकीय संस्कृती होती जिथे राजकीय हितापाई अनेकदा देशहिताचे निर्णय लांबणीवर जायचे. पण मोदी आल्यापासून हे होताना दिसत नाही. अनेकदा जनतेलाही कटू वाटू शकतील असे निर्णय घेताना ते दिसतात आणि तरीही जनता त्या निर्णयाचे समर्थन करताना आणि त्यांना पाठिंबा देताना दिसते. याचे कारण ते निर्णय घेत असताना राष्ट्रहिताशी कधीही तडजोड करत नाहीत. ते जनतेला आपल्या निर्णयांबद्दल समजावून सांगतात, त्याची आवश्यकता पटवून देतात आणि त्यांचा सहभाग सहकार्य याची अपेक्षाही व्यक्त करतात. नागरिकांना सोबत घेऊन देशाला प्रगतीपथावर नेण्याचा त्यांचा निर्धार जनतेला मनापासून भावतो.

आजच्या घडीला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. सध्याचे चित्र बघता २०२४ ला सुद्धा पुन्हा निवडून येण्याच्या मार्गावर आहेत. पण एक दिवस असा नक्की येईल की ज्या दिवशी मोदी हे पंतप्रधानपदी नसतील. भारताच्या राजकारणात नसतील. पण लोकांच्या मनात मात्र ते नक्की असतील. भारताच्या राजकीय इतिहासात त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर नक्कीच अमरत्व संपादन केले आहे. ते त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी लक्षात राहतीलच. पण त्या सोबतच देशाची राजकीय संस्कृती बदलणारा नेता ही देखील त्यांची ओळख कोणीच पुसू शकणार नाही

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा