पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पीटीआय (पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ) सरकारला सत्तेत येऊन ३ वर्षे पूर्ण झालेत. त्यानिमित्ताने इम्रान सरकारकडून मागील ३ वर्षात पाकिस्तानने कशी प्रगती गेली यासाठी जोरदार जाहिरातबाजी केली जातेय. यात इम्रान यांच्या कामाचा रिपोर्टही सादर केला जातोय. सोबतच या कामाचा पुरावा म्हणून काही फोटोही छापले जात आहेत. मात्र, पाकिस्तानच्या विकासाच्या नावे दाखवलेले हे फोटो पाकिस्तानचे नसून भारतातील आहेत. त्यामुळे इम्रान खान यांची चांगलीच नाचक्की झालीय.
पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सरकारच्या कामाचा रिपोर्ट सादर करताना भारतीय वेबसाईटवरुन फोटो चोरल्याचा आरोप आहे. यावरुन पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनीही जोरदार टीका केलीय. विरोधी पक्षांनी इम्रान खान यांना घेरलंय. विरोधी पक्षांसह सर्व सामान्य पाकिस्तानी नागरिक देखील सोशल मीडियावर इम्रान सरकारच्या या खोटारडेपणावर सडकून टीका करत आहेत.
पाकिस्तामधील विरोधी पक्षाच्या नेत्या आणि खासदार मरियम औरंगजेब यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केलाय. यात त्यांनी म्हटलं, “षडयंत्रकारी इम्रान खान यांनी ३ वर्षांची आपली कामगिरी दाखवण्यासाठी भारतीय वेबसाईटवरील फोटोंचा वापर केलाय. हाच इम्रान सरकारच्या ‘परफॉर्मंस’ रिपोर्टचा पुरावा आहे.”
पीटीआय पक्षाने मागील ३ वर्षांमधील कामाचे अनेक जाहिरातपत्रक प्रकाशित केलेत. विरोधी पक्ष नेत्या मरियम यांनी यावरुनच सरकारला फटकारलंय. “इम्रान खान यांना अवतारी पुरुष दाखवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची दाखवण्यात येणारी गरीब कल्याण योजना भारतीय पोर्टलवरुन चोरी केलेल्या फोटोंवर आधारीत आहे. हा याचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. जर पाकिस्तानमध्ये रोजगार तयार झाले असते, नव्या योजना लागू झाल्या असत्या आणि त्याचा लोकांना उपयोग झाला असता तर त्याचेही फोटो आणि पुरावे असले असते,” असं मत मरियम यांनी व्यक्त केलं.
हे ही वाचा:
‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे
ठाकरे सरकारची गळचेपी फार काळ चालणार नाही
भारताला पॅरालिम्पिकमध्ये भरघोस यश
मरियम यांनी या खोट्या जाहिरातीबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेची मागणी केलीय. मरियम म्हणाल्या, “आज आपल्याला खोटा विकास आणि समृद्धी दाखवण्यासाठी भारताच्या वेबसाईवरील फोटो चोरावे लागत आहेत. आता इतकं होऊनही ते येतील आणि लाज वाटण्याऐवजी आणि माफी मागण्याऐवजी या खोटारडेपणा आणि चोरीवरही सारवासारव करतील. महागाई आणि बेरोजगारी सर्वसामान्य नागरिकांना गरिबीत ढकलत आहे. दुसरीकडे हे मात्र लोकांच्या करातील पैशांमधून कोट्यावधी रुपये वर्तमान पत्रात आपला खोट्या कामाचा अहवाल छापण्यात कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहेत.”