धारावीतील शाहूनगर परिसरातील दोन घरांमध्ये घरगुती गॅसची गळती होऊन सिलिंडरचा प्रचंड मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी घडली. या स्फोटात १५ जण जखमी झाले असून त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या बहुतांश नागरिकांचे चेहरे गंभीररीत्या भाजले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धारावी परिसरातील सर्व घरे ही दाटीवाटीने बांधलेली आहेत. याच परिसरातील शाहूनगरमधील दोन घरांमध्ये रविवारी दुपारच्या वेळेत अचानक घरगुती गॅसमधून गळती झाली आणि काही क्षणातच दोन्ही सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. सिलिंडर स्फोटांमुळे या परिसरातील अनेक झोपड्यांना आग लागली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन दोन बंब आणि एका जेट इंजिनच्या मदतीने आग आटोक्यात आणली. दरम्यान या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जण ७० टक्के भाजले आहेत. जखमींवर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा:
बाळासाहेब गेल्यावर ठाकरी शैलीही संपली!
शाळा सुरू करण्यासाठी लसीकरण कशाला हवे?
संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालत आहेत!
राहुलजी, ही टोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नव्हे!
स्फोट ज्या चाळीत झाला त्याच चाळीतील रहिवासी मोहम्मद यासीन यांनी आपला जीव वाचवला. स्फोट झालेल्या चाळीत तिसऱ्या मजल्यावर राहणारे यासीन यांनी स्फोटाचा आवाज ऐकताच तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. उडी मारल्यावर त्यांना किरकोळ जखमा झाल्या. आता ते शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्फोट झाल्यावर सर्वत्र गोंधळ निर्माण झाला होता. प्रत्येकजण जिथे सापडेल तिथून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत होते, असे त्यांनी सांगितले.