यावर्षी आयसीसीचा टी-२० विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. या विश्वचषकामध्ये भारताची पहिली लढतच पाकिस्तानसोबत होणार आहे.
आयसीसीने यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा यावर्षी भारतात होणार होती. मात्र कोरोनाच्या उद्रेकामुळे आता स्पर्धेचं आयोजन ओमान आणि युरोपमध्ये करण्यात आलं आहे. आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर काही काहीच दिवसात भारत- पाकिस्तान एकमेकांसमोर भिडणार आहेत. या स्पर्धेमधील सामने दुबई, अबूधाबी, शारजाह आणि ओमानमध्ये होणार आहेत. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत.
हे ही वाचा:
लसीचा एक डोस घेतलात तरी तुम्ही सुरक्षित
पालकच म्हणू लागले शाळा सुरू करा!
मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस
भारताचा पहिला मुकाबला पाकिस्तानशी असून हा सामना २४ ऑक्टोबर रोजी दुबईत रंगणार आहे. विविध कारणांमुळे भारत- पाकिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून द्विपक्षीय सामने खेळवले गेले नाही आहेत. पण आता टी-२० विश्वचषकात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याकडे भारत- पाकिस्तानमधील चाहत्यांसह संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा एका विश्वचषकात आमने- सामने असणार आहेत. आयसीसीने केलेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या ग्रुपच्या घोषणेनुसार, दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे.
टी-२० वर्ल्डकपसाठी ग्रुप कसे असणार याची घोषणा आधीच करण्यात आली आहे. पहिल्या राउंडमध्ये ८ टीम्स सुपर १२ मध्ये जागा बनवण्यासाठी खेळतील. ‘ग्रुप-ए’ मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स आणि नामिबिया यांचा समावेश आहे. तर ‘ग्रुप बी’ मध्ये बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी आणि ओमान या टीम आहेत. या दोन्ही ग्रुपमधल्या प्रत्येकी सर्वोच्च दोन-दोन टीम विश्वचषकासाठी खेळतील. सुपर १२ चे सामने २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. याआधी १७ ऑक्टोबरपासून पहिल्या राउंडचे सामने खेळले जातील.
सुपर १२ च्या ग्रुप १ मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिय, साउथ आफ्रिकेसह पहिल्या राउंडच्या ग्रुप ए मधील विजेता संघ आणि ग्रुप बीचा रनर अप संघ असेल. तर ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तानसह पहिल्या राउंडमधील ग्रुप बीचा विजेता संघ आणि ग्रुप ए ची रनर अप टीम असेल.