आकाश धोंडे नाव असलेल्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. चोरी करून तो गायब झाला होता.
धावत्या लोकलमध्ये एका तरुणीला मारहाण करून तिचा मोबाईल लंपास केल्याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पण तपासादरम्यान आकाश याने नशेमध्ये तरुणीला मारहाण करून तिच्याकडील मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले आहे.
तक्रारदार तरुणी ही वसई येथे रहाते. दोन दिवसांपूर्वी ही तरुणी मालाड येथे मासे खरेदी करण्यासाठी आली होती. मासे खरेदी करून झाल्यानंतर तिने वसईला जाण्यासाठी बोरिवली इथून जलद लोकल पकडली. ही लोकल बोरिवली ते वसई दरम्यान कोणत्याच स्थानकांवर थांबत नाही. लोकल बोरिवली स्थानकावरून सुरू होतानाच आकाश महिलांच्या डब्यात चढला. त्यावेळी ही तरुणी महिला डब्यात एकटीच प्रवास करत होती. कोणी नसल्याचे पाहून आकाश याने नशेत तरुणीला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने या तरुणीचा मोबाईल आणि पर्समधले २०० रुपये चोरले. वसई स्थानक येण्यापूर्वी लोकल सिग्नलवर थांबली तेव्हा डब्यातून उडी मारून आकाश पसार झाला.
हे ही वाचा:
आज काबुलकडून दिल्लीला येणार शेवटचे विमान
मल्लखांबाचा ऑलिम्पिक मार्ग व्हाया जपान
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
लोकल वसई स्थानकात आल्यावर तरुणीने पोलिसांना झाल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर तरुणीने बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अनिल कदम, सहाय्यक निरीक्षक दर्शन पाटील, मुजावर, मोरे, खाडे, पवार यांच्या पथकाने प्रकरणाचा तपास सुरू केला असता आकाश वसईत येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आकाशला अटक केली. आकाशची चौकशी केल्यावर आकाशने गुन्ह्याची कबुली दिली. आकाशला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.