अफगाणिस्तानातील परिस्थिती वेगाने चिघळू लागली आहे. तालिबानने काबुलवर कब्जा प्रस्थापित करायला सुरूवात केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गानी यांनी राजिनामा दिला आहे. त्यामुळे सध्या देश तालिबानच्या अंतरिम राजवटीच्या अंमलाखाली जातो की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत भारताने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार काबुलवरून आज रात्री शेवटचे विमान दिल्लीला येणार आहे. हे विमान आज रात्री दिल्लीला पोहोचणार आहे. सध्या विमानाची उड्डाणपूर्व तयारी चालू असल्याचे समजत आहे.
एआय २४३ या विमानात सध्या काबुल विमानतळावर इंधन भरण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यानंतर हे विमान दिल्लीच्या दिशेने उड्डाण करणार आहे. यापूर्वी एक खासगी विमान काबूलकडे येणार होते जे रद्द केले गेले आहे.
हे विमान काबुलच्या परिसरात पोहोचले तेव्हा काबुल एअर ट्रॅफिक कंट्रोल बंद असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यामुळे विमान उतरवण्यासाठी एआय २४३ ला कोणाचेही सहाय्य उपलब्ध नव्हते. त्यानंतर या विमानाच्या वैमानिकांनी तालिबानकडून होऊ शकणारा हल्ला टाळण्यासाठी रडार बंद करून विमान उतरवले.
हे ही वाचा:
म्हणून विराटची ऑडी आहे पोलिसांच्या ताब्यात
मल्लखांबाचा ऑलिम्पिक मार्ग व्हाया जपान
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
एआय २४३ विमान बऱ्याच नाट्यमय घटनांनंतर सुरक्षितपणे काबुलला उतरले होते. या विमानातून भारताच्या काबुल येथील दुतावासातील कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांना परत आणण्यात येणार आहे.
तालिबानने काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी मुत्सद्दी सत्तेच्या ‘शांततापूर्ण’ परिवर्तनासाठी राष्ट्रपती भवनावर पोहोचले होते. मात्र अद्यापही सत्ता परिवर्तन नेमके केव्हा होणार याबाबत अनभिज्ञता आहे. या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानात गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे. सध्या गानी यांच्या राजीनाम्यानंतर तालिबानचे अंतरिम सरकार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.