शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणा पुढाकार घेत नसल्यामुळे आता नागरिकांसोबतच वाहतूक पोलीसही बेजार झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात शहरातील मुख्य आणि अंतर्गत मार्गांवर वाहतूक कोंडी होत असते.
देशावरील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरकारने गर्दी टाळण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे राज्यातील निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वच खाजगी आणि सरकारी कंपनींमधील कर्मचारी संख्या वाढली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली असली तरी लसीची एक मात्रा किंवा लस न घेतलेल्यांची संख्याही मोठी आहे. त्यांना रस्ते वाह्तुकीशिवाय पर्याय नसल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे.
हे ही वाचा:
…आणि डॉक्टरच्या खात्यातून गायब झाले पैसे
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यात वाढ होते शिवाय या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वाहने आपटून अपघात होत असतात. त्यातून बऱ्याचदा वाहन चालकांमध्ये वाद होतात, असे वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. वाहतूक कोंडीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागतो. वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसुद्धा करावी लागते. मात्र वाहतूक कोंडीमुळे पोलिसांना पुरेसा वेळ देता येत नाही.
२०१६ ते २०१९ या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवर दहा हजार ७६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. २०१८ पेक्षा २०१९ मध्ये जास्त प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. २०१९ मध्ये दोन हजार १४० प्रवाशांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता, तर २०१८ मध्ये दोन हजार १५ नागरिकांना आपला प्राण आपघातात गमवावा लागला होता. २०२० च्या अहवालाचे काम अजून सुरू आहे.