केस गळू लागल्यामुळे कृत्रिम केसांचा विग बसविण्याचा निर्णय एका व्यक्तीने घेतला खरा पण तो विग नापसंत झाला आणि त्याने कंपनीला न्यायालयातच खेचले.
एका कंपनीला मुंबईतील या ग्राहकाला १.५ लाख रुपये परत करावे लागले. ग्राहकाने कंपनीकडून दोन लाख रुपयांचा ‘स्ट्रॅन्ड बाय स्ट्रॅन्ड कॉस्मेटिक’ प्रकारचा विग खरेदी केला होता. पण हा विग कंपनीने दिलेल्या वचनाप्रमाणे नैसर्गिक दिसून येत नव्हता, असा आरोप करण्यात आला. केस हे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर आणि आत्मविश्वासावर परिणाम करत असतात आणि एखादी कंपनी ग्राहकाला नापसंद असलेले उत्पादन घेण्यास भाग पाडू शकत नाही, असे मत या प्रकरणात जिल्हा मंचाने नोंदवले.
ऍडव्हान्स हेअर स्टुडिओ प्रा. लि. या कंपनीला जिल्हा मंचाने ४६ वर्षीय ग्राहकाचे नुकसान केल्याप्रकरणी नुकसान भरपाई म्हणून पंधरा हजार भरण्याचे आदेश दिले आहेत. २०१४ मध्ये या ग्राहकाने ख्यातनाम व्यक्तींच्या जाहिराती पाहून विगची खरेदी केली होती. ऑक्टोबर २०१५ मध्ये या ग्राहकाने मुंबईच्या जिल्हा ग्राहक विवाद निराकरण मंचाकडे तक्रार केली होती. कंपनीच्या वरिष्ठ सल्लागाराने त्यांना दाखवलेल्या फोटोंमध्ये व्यक्तीच्या डोक्यावरील केस विग लावल्यावरही नैसर्गिक दिसत, म्हणून उत्पादन खरेदी केले होते. २०१४ मध्ये उत्पादनाचे पूर्ण पैसे भरल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राहकाने सांगितले की त्याला मिळालेल्या उत्पादनामुळे त्याची निराशा झाली आहे. त्याला मिळालेला विग हा अगदीच सामान्य विगसारखा दिसतो; जो २० हजार ते ५० हजारांना बाजारात मिळेल. जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे ‘संपूर्ण नैसर्गिक रूप’ हे कुठेही उत्पादनाचा वापर करताना जाणवले नसल्याचे ग्राहकाने म्हटले. केसांचा विग परत काढण्यासाठीही त्याला १,०५० रुपये खर्च करावे लागले. कंपनीने पैसे परत करण्यास नकार दिल्यावर ग्राहकाने तक्रार जिल्हा मंचासमोर मांडली.
हे ही वाचा:
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? उद्धव ठाकरेंचा गोंधळ
संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात जाण्याचा धोका वाढला
‘वंदे भारत’ गाड्यांबाबत मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
कंपनीचे संपूर्ण भारतात स्टुडीओ आहेत. तसेच ग्राहकाला उत्पादन खरेदीपूर्वी ४५ मिनिटांच्या सल्लामसलत सत्रात सहभागी केले होते आणि उत्पादनाची माहिती दिली होती. तसेच ग्राहकाने सर्व अटी मान्य केल्याची कागदपत्रांवर सहीसुद्धा केली. अटींनुसार पैसे परत करता येणार नाहीत असे कंपनीने सांगितले. परंतु ग्राहक समाधानी नसेल तर त्याच्यावर अटींची बंधन नसतील असे मत जिल्हा मंचाने मांडले.
केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकत असतात. प्रत्येकाची वेगळी ओळख असते तशीच प्रत्येकाची केसांचीही वेगवेगळी शैली असते. त्यामुळे कोणीही सहज आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी त्याग करणार नाही. ग्राहकाला पैसे परत मिळण्याचा अधिकार असला तरी कंपनी उत्पादनातील घटकांचा खर्च आणि इतर खर्च कापून घेऊ शकते. ग्राहकाला पूर्ण पैसे परत मिळणार नाहीत, असे जिल्हा मंचाने स्पष्ट केले.