टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. ऑलिम्पिकमधील सुमार कामगिरी आणि गैरवर्तनाबद्दल लादण्यात आलेल्या निलंबनामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या विनेशने टीका करताना मॅटवर पुन्हा न जाण्याची भावना व्यक्त केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये विनेशने स्पर्धेची दमदार सुरुवात करून बाद फेरीची लढत जिंकली. मात्र उपांत्यपूर्व फेरीत विनेशला अपयश आले आणि पदकाची आशा संपली.
काही दिवसांपूर्वीच ऑलिम्पिकदरम्यान विनेशने अन्य भारतीय कुस्तीपटूंसोबत राहण्यास आणि सराव करण्यास नकार दिला होता अशी बातमी समोर आली होती. त्याशिवाय अधिकृत प्रायोजकांचे नाव असलेली जर्सी न घालताच सामन्यासाठी मॅटवर उतरल्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाने (डब्लूएफआय) विनेशला तात्पुरते निलंबित केले आहे.
गेला आठवडा माझी कसोटी पाहणारा ठरला. टोकियो ऑलिम्पिकमधील पदक हुकल्यामुळे मी फार मोठा गुन्हा केल्यासारखे भासत आहे. मी इथ पर्यंत कोणत्या परिस्थितीत पोहचले हे माहित नसलेले लोकही टीका करत आहेत. माझ्याकडून असलेल्या अपेक्षा किंवा दडपणामुळे मी हरले नाही. त्यामुळे खेळाडूचे म्हणणे ऐकून घ्या,असे मत विनेश फोगट हिने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत मांडले. ऑलिम्पिकमध्ये माझ्या डाव्या पायाची दुखापत पुन्हा बळावल्यामुळे पदकाची संधी हुकली. सामन्याच्या दिवशी मी खेळायच्या स्थितीत नव्हते. पराभवानंतरही सर्वांनी मी कुठे चुकली हे सांगितले, पण का चुकले हे विचारले नाही, असेही मत तिने मांडले.
हे ही वाचा:
फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’
मुंबई पोलिसांना सेटलमेंटचे आदेश?
ड्रग्स तस्करांनी केला एनसीबी अधिकाऱ्यांवरच हल्ला
जम्मू काश्मीरमधून ४ दहशतवाद्यांना अटक
युवा कुस्तीपटू सोनम मलिक हिलाही कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. तिने त्याचे उत्तर दिले असून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. मात्र विनेशने अजूनही या नोटीसचे उत्तर दिले नसल्यामुळे तिच्यावरील निलंबन कायम आहे, असे महासंघाने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेची खेळाडू सिमोन बाइल्सने मानसिक तणाव असल्यामुळे ऑलिम्पिकमधील काही प्रकारात भाग न घेण्याचा निर्णय घेतला. पण अशा व्यथा जेव्हा भारतीय खेळाडू मांडतो त्याकडे दुर्लक्ष केल जात. टोकियोमध्ये मी पूर्णवेळ एकटी होती. त्यामुळे आताही काही काळ मला एकटीला राहायचे आहे. सद्यस्थिती पाहता मॅटवर न परतणे अधिक सोयीचे वाटत आहे अशी भावना विनेश हिने व्यक्त केली.