कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला आहे. गणेशोत्सव मंडळे तसेच नवरात्रौत्सव मंडळांना जाहिराती स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती, पण त्यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर पालिकेला नमते घ्यावे लागले.
आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. आर्थिक फटका बसलेल्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी मंडळांना वर्गणी कमी मिळाली. प्रायोजकांनीही आखडता हात घेतला. मागील वर्षी पालिकेने व्यावसायिक जाहिराती घेण्यास मंडळांना बंदी घातल्यामुळे मंडळे आर्थिकदृष्ट्या नुकसानीत आली आहेत. त्यामुळे यावर्षी जाहिरातींना परवानगी द्यावी, असा आग्रह मंडळांनी पालिका बैठकीत धरला होता. मंडळांच्या या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हे ही वाचा:
गोंधळ घालणाऱ्यांनी आधी माफी मागावी!
नियुक्तीपत्राऐवजी भरती रद्द झाल्याचे पत्र आले
भारतीय गायींच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल
मुंबई महापालिकेत बदल्या, बढत्यांमध्ये घोटाळा?
पालिकेने ११ ऑगस्ट २०२१ रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकात जाहिरातींच्या परवानगीविषयी माहिती दिली आहे. मंडपाच्या प्रवेशद्वारापासून शंभर मीटर अंतरामध्ये जाहिरात लावण्यास १०१ रुपये तर शंभर मीटरबाहेर जाहिरातीसाठी एक हजार रुपये शुल्क आकारून परवानगी दिली जाणार आहे. मंडपाच्या आतील जाहिरातींसाठी १२५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. फूटपाथवरील जाहिरातीस मनाई करण्यात आली आहे. पालिकेची उद्याने आणि मैदानात आयोजित केल्या जाणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या परवानगी शुल्कातही मोठी कपात करण्यात आली आहे.
गुटखा, तंबाखू, दारू उत्पादनाची जाहिरात करता येणार नाही. सिनेमा, दूरचित्रवाणी मालिकांच्या जाहिरातींमध्ये अश्लील जाहिरातीस बंदी. प्रवेशद्वाराच्या वरच्या आडव्या बाजूस ‘भक्तांचे हार्दिक स्वागत’ आणि उजव्या व डाव्या बाजूस जाहिराती लावता येतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संदेश लावणे बंधनकारक असेल. जाहिरातींमुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर आणि पादचाऱ्यांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे, असे नियम नियमावलीत आहेत.