ठाणे जिल्ह्यातील तसेच आगरी समाजातील पहिले केंद्रीय मंत्री होण्याचा बहुमान मिळवलेले भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सोमवार, १६ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. ठाणे, कळवा, मुंबर, दिवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी अशा सर्व ठिकाणहून या यात्रेचा प्रवास होणार आहे. तर यावेळी मंत्री महोदय हे नागरिकांमध्ये मिसळून त्यांचे आशीर्वाद घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा काही दिवसांपूर्वी पार पडला. या विस्तारित मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर आता या सर्व मंत्र्यांनी देशाच्या जनतेत मिसळून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहे. त्यासाठी भाजपातर्फे देशभर जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून या सर्व मंत्र्यांनी मतदारसंघात जाऊन आपल्याला निवडून देणाऱ्या जनतेत मिसळून त्यांचे आशीर्वाद घेणे अपेक्षित आहे.
मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील ४ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कपिल पाटील हे आहेत. त्यांना पंचायतराज राज्य मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात अली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पाटील हे आपल्या जिल्ह्यात परतणार आहेत. ठाणे शहरातील आनंद नगर चेकनाक्याहून १६ ऑगस्ट रोजी यात्रेला सुरुवात होईल. पहिल्या दिवशी ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व येथून यात्रा जाणार आहे. दुसऱ्या दिवशी १७ ऑगस्ट रोजी अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून यात्रा फिरेल. तिसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट रोजी कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, म्हारळ, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील विविध भागातून यात्रा जाईल. चौथ्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी मुरबाड, किन्हवली, शहापूर, भिवंडी शहरात यात्रा जाणार आहे. तर पाचव्या दिवशी २० ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यात यात्रेची सांगता होईल.
हे ही वाचा:
एनसीबीच्या समीर वानखेडेंचे केंद्राने का केले कौतुक?
…तरच गाड्यांना परवाने द्या! कोर्टाने सुनावले…वाचा
संसदेतल्या गोंधळाचे ‘पोस्टमॉर्टम’! वाचा काय घडले
यात्रेत होणार लाभार्थी संवाद
कपिल पाटील हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणार आहेत. तर त्या सोबतच जिल्ह्यातील सामान्य नागरिक, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये एमआयडीसीतील जमीन मालकांबरोबर बैठक, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तीकारांबरोबर बैठक, भूमिपूत्रांशी संवाद, स्वच्छता अभियान, दिव्यांग लाभार्थींशी चर्चा अशा विविध समाज घटकांचा समावेश असणारा आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या महत्वाकांक्षी अशा समर्थ बूथ अभियानातील अगदी तळातील कार्यकर्त्यांशी पाटील हे संवाद साधतील.
भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्रीय सचिव सुनील देवधर यांना महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर भाजपा आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्यावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या यात्रेच्या आयोजनाची महत्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. सध्या या यात्रेच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून यशस्वी नियोजनासाठी बैठकांची मालिका सुरु आहे.