भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी चार कंपन्या येऊ इच्छित आहेत. त्यासाठी त्यांनी नागरी विमान मंत्रालयाकडे ‘ना- हरकत प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी अर्ज देखील केला आहे. या चार विमानकंपन्यांत काही मोठ्या नावांचा समावेश देखील आहे. या बद्दल नागरी विमान मंत्री व्ही के सिंग यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले.
भारतात विमानसेवा चालू करण्यासाठी चार कंपन्यांनी अर्ज केले आहेत. प्रवासी वाहतूकीसोबतच मालवाहतूकीसाठी देखील एका मोठ्या कंपनीकडून अर्ज करण्यात आला आहे. या चार विमान कंपन्यांमध्ये एसएनव्ही एव्हिएशन प्रा. लि (राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअरलाईन्सची मूळ कंपनी), टर्बो मेघा एअरवेज प्रा. लि. (स्थानिक विमानकंपनी) यांच्या सोबत मालवाहतूकीसाठी जेट फ्रेट लॉजिस्टिक्स लि. आणि स्पाईस एक्सप्रेस अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि. या कंपन्यांनी देखील ना- हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. यापैकी स्पाईस एक्सप्रेस अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि. ही कंपनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्पाईस जेट विमान कंपनीचीच मालवाहतूक करणारी शाखा असणार आहे.
हे ही वाचा:
उपग्रह प्रक्षेपणात इस्रोला आले अपयश
चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
सिंग यांनी सांगितले की भावी संचालक हवाई वाहतूक क्षेत्रात येऊ शकतात. मंत्रालय त्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करण्याच नक्कीच प्रयत्न करेल.
या चार विमान कंपन्यांमध्ये राकेश झुनझुनवाला यांची आकाश एअरलाईन अति-स्वस्त दरातील विमानसेवा देण्याच्या तयारीत आहे. युरोप आणि अमेरिकेच्या धर्तीवर भारतातही हा प्रयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या विमान कंपनीमध्ये इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष आणि जेट एअरवेजचे सीईओ विनय दुबे हे आकाश एअरलाईनचे सहसंस्थापक असल्याचे देखील बोलले जात आहे.
दुसरीकडे स्पाईस जेट या विमान कंपनीला ३१ मार्च २०२१ मध्ये संपलेल्या शेवटच्या तिमाहीत एकत्रितपणे २५७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यानंतर या कंपनीने मालवाहतूकीचा विभागाचे रुपांतर स्वतंत्र कंपनीत करण्याचा निर्णय जाहिर केला होता.