आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये सरकार अथवा शासकीय यंत्रणेच्या विरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे. विविध मुद्द्यांवरून अशा प्रकारचे आंदोलन करण्यात राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था या अग्रणी असतात. अनेकदा या आंदोलनांमध्ये एकसुरीपणा जाणवतो. पण क्वचित प्रसंगी मात्र काही हटके स्वरूपाची आंदोलने बघायला मिळतात, जी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतात.
मंगळवार, १० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक अशाच प्रकारचे हटके आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन होते अर्धनग्न आंदोलन. बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुकारले होते. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तेव्हा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला.
हे ही वाचा:
राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
औरंगाबाद महापालिकेतही होता तळीरामांचा अड्डा?
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी
बुलढाणा जिल्ह्यातील रस्त्यांची पावसामुळे चाळण झाली आहे. हे सर्व रस्ते जनतेचे प्रमुख दळण वळणाचे साधन आहे. तसेच जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला हे रस्ते जोडले जातात. त्यामुळे या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी मनसे मार्फत जिल्हा परिषदेकडे पत्र, निवेदने देण्यात आली होती. पण या सगळ्याकडेच प्रशासनामार्फत दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.