टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स यांनी एप्रिल २०२० पासून पाचव्यांदा विस्तारा या विमान कंपनीत पैसे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याखेपेला दोन्ही कंपन्या मिळून तब्बल साडेसातशे कोटी रुपये देणार आहेत.
विस्तारा या विमानकंपनीमध्ये टाटा सन्सची ५१ टक्क्यांची भागेदारी असून त्यांनी या कंपनीमध्ये ३८२.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सिंगापूर एअरलाईन्सकडून ३६७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक ७५ कोटी समभागांच्या रुपात केलेली आहे.
विस्तारा एअरलाईन्स देखील इतर सर्व कंपन्यांप्रमाणे कोविड-१९च्या महामारीचा सामना करत आहे. कोविड-१९ मुळे घसरलेल्या प्रवासी संख्येचा फटका या कंपनीला देखील बसला आहे. अशा वेळेस टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स या दोन्ही कंपन्या विस्तारा एअरलाईन्समध्ये पैसे टाकणार आहे.
हे ही वाचा:
भूमिपुत्रांवर बुलडोझर! मराठी टक्का टिकणार कसा?
नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान
पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!
विस्तारा एअरलाईन्सकडे ४८ विमानांचा ताफा आहे. यामध्ये ३७ एअरबस ३२०, ३ एअरबस ३२१ नीओ, ६ बोईंग ७३७-८००एनजी आणि २ बोईंग ७८७-९ ड्रीमलाईनर यांचा समावेश आहे. त्याशिवाय सुरू झाल्यापासून कंपनीने २ कोटी ५० लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे.
कोविड-१९ चा फटका मोठ्या प्रमाणात अनेक कंपन्यांना बसला आहे. सीएपीए- सेंटर फॉर एव्हिएशनने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये इंडियन एअरलाईन्स एकत्रितपणे ८.२ बिलीयन डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान टाटा सन्स सरकारच्या एअर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करायला तयार आहे.