मराठा समाजाला आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे येत्या २० ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
नांदेड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी मूक आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यात केली. ठाकरे सरकारकडून कुठलीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नांदेडला २० ऑगस्ट रोजी मूक आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या मेळाव्यात घेण्यात आला. महालक्ष्मी लॉन्समध्ये मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने सोमवारी आयोजित मेळाव्यात छत्रपती संभाजीराजे बोलत होते.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात ५८ मूक मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आले. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य कायदेशीर बाजू मांडावी. राज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू करावेत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची नेमणूक करून निधी उपलब्ध करून द्यावा, ‘सारथी’ साठी एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मराठा आरक्षणासह मराठा समाजातील तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कोल्हापूर आणि नाशिक येथे मूक आंदोलन करण्यात आले होते.मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी अनेक आंदोलने करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळे मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.
हे ही वाचा:
सागरी सुरक्षेसाठीची ही होती पंतप्रधान मोदींची पंचसूत्री
कोविड योद्धा मानत असाल तर अभियंत्यांना पदोन्नती द्या!
भारताने अफगाणिस्तानमधून नागरिक परत बोलावले
नांदेडमध्ये २० ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मूक आंदोलन होणार आहे. तर, औरंगाबाद येथे १९ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.